कवळे रांगोळी स्पर्धेत सर्जनशिलतेच्या विविध छटा : विविध राज्यातून 102 कलाकारांचा सहभाग
फोंडा : रांगोळी कलेचे आयुष्य खरे तर अल्पजीवी…! तरीही सर्जनशिल कलाकार या कलेच्या माध्यमातून समाजमनावर खोल परिणाम साधू शकतात. समानभान असलेल्या कलाप्रेमींना काही क्षण अंर्तमुख करण्याची ताकद या क्षणिक कलेमध्ये निश्चितच आहे. कवळे येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय रांगोळी स्पर्धेतील कलाकारांनी रांगोळी कलेतून हाच परिणाम साधला. माणसाच्या आयुष्यातील जीवंत क्षण प्रभावीपणे या रांगोळीतून साकारण्यात आले.
देशभरातील 102 कलाकारांचा सहभाग
प्रसिद्ध रांगोळी कलाकार आकाश नाईक यांच्या रंकाश पोट्रेट रांगोळी क्लासेस आणि माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रांगोळी स्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण झाले. गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व अन्य काही राज्यातून आलेल्या तब्बल 102 कलाकारांनी आपल्या सृजनशिल व संवेदनशिल कलेचे दर्शन या रांगोळीतून घडविले. सण, उत्सवांचे सौंदर्य वाढविणाऱ्या रांगोळीतून मानवी जीवनाच्या दु:खद छटाही प्रभावीपणे मांडता येतात, हेच या रांगोळी कलाकारांनी दाखवून दिले. कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या सभागृहात आयोजित केलेली स्पर्धा व रांगोळी प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली. रांगोळी कलेच्या या विविध भावछटा पाहून शेकडो कलाप्रेमी अचंबित झाले.
ज्वलंत विषयांचे प्रतिबिंब
पोट्रेट शैलीतील या रांगोळी स्पर्धेत कलात्मक सौंदर्यस्थळांबरोबरच समाजातील विविध ज्वलंत विषय, राष्ट्राभिमान, मानवी भावभावना व नातेसंबंधातील विविध छटा कलात्मकरित्या उमटल्या. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण व अन्य भागातून आलेल्या कलाकारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, दुष्काळ, भूकबळी, गरीबी, बालमजुरी, पंढरीची वारी असे विविध विषय प्रतिकात्मरित्या साकारले. मानवी तत्करी, अंधश्रद्धा हे ज्वलंत प्रश्नही रांगोळीतून उमटले. मानवी भावभावनांची गुंफट, विभक्त कुटुंबामुळे ज्येष्ठ नागरिकांची चाललेली फरफटही काही कलाकृतीतून दिसून आली. बालविश्व व प्राणीप्रेम या निखळ मैत्रीचे धागेही काही रांगोळीतून साकारले गेले. व्यसनाधीनता व त्यातून उद्ध्वस्त होणारी कुटुंबे, मद्यप्राशनामुळे होणारे अपघात या सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या लक्षवेधक ठरल्या.
सर्जनशिलता, प्रयोगशिलता व समाजभान
राष्ट्राभिमानाशी जोडल्या गेलेल्या पुणे येथील प्रमोद आर्वी यांच्या ‘उरी : सर्जिकल स्ट्राईक’ या विषयावरील रांगोळीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. गोमंतकीय सुपुत्र व माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर रेखाटलेली रांगोळी तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी, गोवामुक्ती लढ्याचे प्रणेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या रांगोळ्याही या प्रदर्शनातील आकर्षण ठरल्या. गोव्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय पातळीवर ही रांगोळी स्पर्धा झाली. रांगोळी कलेचे आधुनिक दर्शन तर त्यातून घडलेच शिवाय कलाकारांची सर्जनशिलता, प्रायोगिकता व समाजभानही दिसले.
पुण्याच्या प्रमोद आर्वींची ‘सर्जिकल स्टाईक’ सर्वोत्कृष्ट
मडकई मतदार संघाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर व मगोचे युवानेते मिथील ढवळीकर यांच्याहस्ते विजेत्या कलाकारांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी या उपक्रमाचे संयोजक तथा रांगोळी कलाकार आकाश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, कवळे पंचायतीच्या सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर, माजी सरपंच राजेश कवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. रंकाश पोट्रेट रांगोळी वर्गातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेतील प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पुणे येथील प्रमोद आर्वी यांना प्राप्त झाले. त्यांना ऊ. 20,000, चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. मुंबई येथील प्रशांत सुवर्णा यांना ऊ. 15000 चे द्वितीय तर मुंबईच्या रमेश पांचाळ यांना ऊ. 10,000 चे तृतीय पारितोषिक मिळाले. साई पारकर, मालवण व किशोर पांचाळ, मुंबई यांना अनुक्रमे चौथे व पाचवे पारितोषिक प्राप्त झाले. याशिवाय दहा उत्कृष्ट रांगोळ्यांसाठी उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.