जत मधील फलकाने जिल्हाभर चर्चा
जत प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावून चौकशी साठी बोलावले आहे. याचा जाहीर निषेध म्हणून जतमध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जत एस. टी.बस स्थानकच्या आवारात “भाजपच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा, एक लाख मिळवा” या फलकाने खळबळ उडाली असून संपूर्ण जतकरांचे लक्ष वेधून घेतले.
शिवाय, या फलकातून ईडीच्या कारवाई विरोधात जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ आदी नेत्यावर कारवाईचा बगडा उचलला आहे. यानंतर ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आय. एल. व एफ एस. प्रकरणी नोटीस बजावून सोमवारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
यामुळे सांगली जिल्ह्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाजपच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याच भूमिकेतून जत शहरातील बस स्थानक परिसरात “भाजपच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा, एक लाख मिळवा” असे फलक लावून कारवाईचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. शिवाय, याची जोरदार चर्चा रंगली होती.
भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई
राज्याचे नेते आ. जयंत पाटील साहेब यांनी राज्यात भाजपच्या चुकीच्या धोरणावर प्रखरपणे आवाज उठवला. शिवाय, राज्यात निष्कलंक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. मात्र, भाजप सूडबुद्धीने ईडीच्या माध्यमातून चौकशीच्या भवऱ्यात अडकवून त्यांची राजकीय कारकीर्द मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यात भाजप कदापि यशस्वी होणार नाही.