प्रतिनिधी,कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील कोरोची व गोवा येथील नवदांपत्यांचा हातकणंगले येथे मंगळवारी धुमधडाक्यात विवाह झाला. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास या नवदांपत्याने हेलिकॉप्टरमधून करवीर निवासीनी अंबाबाई मंदीर व श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथे पुष्पवृष्टी केले. अचानकपणे झालेल्या या पुष्पवृष्टीची दिवसभर मंदीर परिसरात चर्चा सुरू होती.
कोरोची येथील अभियंता प्रियांका माळी यांचे मंगळवारी गोव्यातील हार्डवेअर व्यावसायिक शशिकांत गोसावी यांच्याशी तर शशिकांत गोसावी यांची बहिण संजना गोसावी यांचा विवाह प्रियांका माळी यांचे बंधू नवनाथ माळी यांच्याशी विवाह पार पडला.यानंतर या नवविवाहित दांपत्याने लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई आणि जोतिबा मंदिरावर चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.अचानक आकाशातून होणाऱ्या या पुष्पवृष्टीमुळे उपस्थितांच्या नजरा याकडे खिळल्या.आकाशातून केलेल्या पुष्पवृष्टीमुळे अंबाबाई मंदिर,जोतिबा मंदिर व भवानी मंडप परिसरात फुले पसरल्याचे दिसून आले.या दांपत्याने विवाहानिमित्त अनोखा उपक्रम राबवून आपली हौस पूर्ण केली.
दरम्यान, या दांपत्याने अंबाबाई आणि जोतिबा मंदीरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी 23 मे रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे परवानगी मागितली. करवीर प्रांताधिकारी, पन्हाळा प्रांताधिकारी, करवीर तहसीलदार, पन्हाळा तहसीलदारांनाही यासंदर्भात कळविण्यात आले होते. यासाठी उजळाईवाडी येथील भारतीय विमान प्राधिकरणच्या संचालकांनीही हिरवा कंदिल दाखविला होता. त्यानुसार मंगळवारी या नवदांपत्याने विवाहबध्द होताच हेलिकॉप्टरमधून अंबाबाई आणि जोतिबा मंदीरावर पुष्पवृष्टी केली
हेलिकॉप्टरचे भाडे तासाला अडीच लाख
पुष्पवृष्टी करण्यासाठी नवदांपत्याने खास पुण्याहून एका खासगी कंपनीकडून हे हेलिकॉप्टर मागवले होते. विवाहानंतर दुपारी तीनच्या सुमारास हातकणंगले येथील हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरमध्ये बसून या नवदांपत्याने अंबाबाई मंदीर व जोतिबा मंदीरावर आकाशातून पुष्पवृष्टी केली. हे हेलिकॉप्टर दुपारी 4 वाजता पुन्हा हातकणंगले येथील हेलिपॅडवर आले. या हवाई प्रवासासाठी सुमारे अडीच लाख रूपये भाडे दिल्याचे वृत्त आहे.