राजकीय नेत्यांसह विविध संघटना-कंपन्यांकडून उत्स्फूर्त सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेच्या आवाहनानुसार, राजकारण्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी रविवारी तासभर श्र्रमदानात भाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 154 व्या जयंतीपूर्वी देशभर स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्र्रमदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, इतर नेते आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी स्वच्छता केली. विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मोहीम देशभर यशस्वी ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी देशभरातील लोकांनी स्वच्छता जनजागृती कार्यक्रमांतर्गत श्र्रमदान केले. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेअंतर्गत देशभरात 9.20 लाखांहून अधिक ठिकाणी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऑल इंडिया रेडिओच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या शेवटच्या भागात मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सर्व नागरिकांना ‘स्वच्छतेसाठी एक तास श्र्रमदान’ करण्याचे आवाहन केले होते. महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही ‘स्वच्छतांजली’ असेल, असे ते म्हणाले होते. दरम्यान, ही मोहीम यशस्वीपणे पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेतील आपल्या श्र्रमदानाचा व्हिडिओ शेअर करत ‘ही कृती स्वच्छ आणि निरोगी भारतासाठी आहे’ अशी टॅगलाईन दिली आहे.
स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी मंत्री, नेते आणि सर्वसामान्य नागरिक सकाळपासूनच उत्साहाने पुढे आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये श्र्रमदान कार्यक्रमात सहभाग घेतला. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पाटणा येथे आयोजित स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत देशासाठी महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा आणि केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी दिल्लीतील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूरमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान दिल्लीत तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा येथे ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सहभागी झाले होते. त्याचवेळी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सफदरजंग रेल्वेस्थानकावर स्वच्छता केली.
मोदी फिट, त्यांना काय टिप्स देणार?
राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रविवारी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकित बैयानपुरिया श्रमदानात सहभागी झाला. पंतप्रधानांसोबत स्वच्छतेबद्दल चर्चा झाली. त्यांनी माझ्या आहाराविषयी विचारल्याचे फिटनेस आणि वर्कआऊटच्या पारंपरिक तसेच देशी शैलींना चालना देण्यासाठी प्रसिद्ध अंकितने सांगितले आहे. पंतप्रधान मोदी हे फिट असल्याने त्यांना मी काय टिप्स देणार? केवळ त्यांचा आशीर्वाद घेतला असे अंकितने म्हटले आहे.