सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात आंबेगाव- कुणकेरी या गावात दिवसाला जवळपास दहा एसटी फेऱ्या धावत आहेत. जवळपास अर्धा ते एक तासाच्या फरकाने एक एसटी बस अशी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण दहा फेऱ्या सावंतवाडी ते आंबेगाव अशी धावत आहेत. तालुक्यात असा एकमेव भाग असेल. एसटी प्रशासनाला प्रवासी वर्ग त्याचबरोबर आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा हा भाग आहे. या गावात एसटी हाच एकमेव पर्याय असून एसटी बसेसचे गाव म्हणून हा गाव ओळखला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच या गावात शटल बस सेवा म्हणजेच एकच एसटी बस या गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सावंतवाडी ते आंबेगाव, आंबेगाव ते सावंतवाडी अशी रुटींग सेवा देणार आहे. तशी सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंबेगाव गावातील सरपंच ,ग्रामस्थ ,सदस्य यांनी एसटी आगाराकडे केली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून या गावात अशी सेवा उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली आहे . मात्र या स्थानकात आतापर्यंत स्थानक प्रमुख ,आगार प्रमुख यांच्या संगीत खुर्चीच्या खेळामुळे ही त्यांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. मात्र आता पुन्हा एकदा एकच एसटी बस रुटींग द्वारे शटल बस सेवा सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते योगेश गवळी यांनी आघाडी व्यवस्थापक निलेश गाबीत व स्थानक प्रमुख विजय शेवाळे यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी आगार व्यवस्थापक निलेश गाबित यांनी स्पष्ट केले. त्या भागातील एकंदरीत प्रवासी संख्या आणि एकंदरीत एसटी बसेसच्या फेऱ्या याचा विचार करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल. आणि तसेच सेवा लवकरच सुरू केली जाईल. या भागात एसटी बस शिवाय लोकांना पर्याय नाही. हे पाहता एसटी प्रशासन निश्चितपणे या भागाच्या प्रवाशांच्या उत्तम सेवेसाठी तत्पर आहे. या भागातील बस सेवा गावात वेळेत कशी पोहोचेल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.