वृत्तसंस्था/ ग्रेटर नाएडा
येथे झालेल्या आशियाई युवा व कनिष्ठांच्या वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्समध्ये भारताच्या सिद्धांता गोगोईने पुरुषांच्या 61 किलो कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले तर ज्ञानेश्वरी यादव कोयल बार यांनी महिलांच्या 49 किलो वजन गटात रौप्यपदके पटकावली.
19 वर्षीय सिद्धांताने एकूण 265 (116+149) किलो वजन उचलत सुवर्ण निश्चित केले. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. कनिष्ठांच्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये त्याने 260 किलो वजन उचलत जेतेपद मिळविले होते. कनिष्ठ पुरुषांच्या विभागातही भारताच्या शंकर लापुंगने 61 किलो वजन गटात 256 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले.
तत्पूर्वी, ज्ञानेश्वरीने महिलांच्या 49 किलो कनिष्ठ विभागात तर कोयल बारने याच वजन गटात पण युवा विभागात रौप्यपदके मिळविली. ज्ञानेश्वरीने एकूण 175 किलो वजन उचलले. स्नॅच व क्लीन-जर्कमध्ये तिचे दोन प्रयत्न अपयशी ठरले. स्नॅचमध्ये तिने 78 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 96 किलो वजन उचलत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. फिलिपाईन्सच्या रोसेगी रॅमोसने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकताना एकूण 182 किलो वजन उचलले तर व्हिएतनामच्या बिर्च ट्राम एन्ग्युनने 169 किलो वजन उचलत कांस्य मिळविले.
युवा विभागात भारताच्या कोयलने 69 व 86 असे एकूण 155 किलो वजन उचलले. या प्रकारात फिलिपाईन्सच्या झोडी पेराल्टाने 160 किलो वजन उचलत सुवर्ण व थायलंडच्या फानिदा डेन्डुआंगने 151 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले.