बेळगुंदी येथे परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचा कृतज्ञता सोहळा : विविध मठाचे मठाधीश उपस्थित.
वार्ताहर / किणये
समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सिद्धेश्वर परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजींनी समानतेचा संदेश दिला आहे. माणुसकी हा एकच धर्म असून माणसाने त्यासाठी कार्य केले पाहिजे. तसेच मानसिक समाधानासाठी भगवंताचे नामस्मरण करा, असा संदेशही स्वामीजींनी दिला. त्यामुळेच त्यांचे भारत देशासह अन्य देशातही भक्त आहेत, असे मनोगत कारंजीमठ येथील मठाचे गुरु सिद्धेश्वर स्वामीजी यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले. परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या भक्तमंडळीकडून बेळगुंदी येथील विश्राम आश्रम येथे सोमवारी कृतज्ञता सोहळ्dयाचे आयोजन केले होते. कार्यक्रम ज्ञान योगाश्रम विजयपूर, मल्लिकार्जुन आध्यात्मिक केंद्र बेळगाव व विश्राम आश्रम बेळगुंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुरु सिद्धेश्वर स्वामीभक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. बेळगुंदी, राकसकोप मुख्य रस्त्याच्या बेळगुंदीनजीक निसर्गरम्य परिसरात विश्राम आश्रम आहे या आश्रमाला परमपूज्य सिद्धेश्वर स्वामी यांचा पदस्पर्श झालेला आहे या आश्रमात स्वामींचा कृतज्ञता सोहळा असल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच बेळगाव परिसरातील भक्तांची आश्रमात गर्दी होऊ लागली .
बेळगुंदी गावातील भजनी मंडळाने टाळ मृदंगाच्या गजरात भजन सादर केले त्यानंतर अमृतानंद महास्वामी नागनूर मठाचे मठाधीश डॉ. अलम प्रभू मल्लय्या स्वामी, बसवलिंग स्वामी, अमृतानंद स्वामी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. विश्राम आश्रमचे अध्यक्ष चिदानंद रूगे यांनी सिद्धेश्वर स्वामींबद्दल भक्तीगीत सादर केले. बी. एस. निंबाळ यांनी प्रास्ताविक करून सिद्धेश्वर स्वामी यांच्या कार्याची माहिती सांगितली. त्यानंतर उपस्थित स्वामींच्या हस्ते सिद्धेश्वर स्वामींच्या फोटो प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी विविध मठाच्या मठाधीशांनी सिद्धेश्वर स्वामी यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेक्रेटरी रवी सोपारीसह विश्राम आश्रमचे सर्व भक्त तसेच बेळगावच्या मल्लिकार्जुन आध्यात्मिक केंद्राचे पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.