अपघाताच्या घटनांमध्ये वाढ : पथदीप बसविण्याची मागणी
बेळगाव : गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्गाशेजारी असणाऱ्या सांबरा सर्व्हिस रोडवरील बाजूपट्ट्या खचल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन खचलेल्या बाजूपट्ट्या भरून काढव्यात, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. पूर्व भागातून शहरात येणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. तसेच सांबरा-बागलकोट रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे शहरात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची नेहमीच या रस्त्यावर गर्दी असते. अशा गजबजलेल्या रस्त्यावरील बाजूपट्ट्या खचल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शहरामध्ये रोजगारासाठी येणाऱ्या पूर्व भागातील नागरिकांची संख्या मोठी आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारकांना खचलेल्या बाजूपट्ट्या नजरेस पडत नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मुख्य रस्त्यावरून वाहन घसरून पडल्याने अनेक अपघात झाले आहेत. जुना गांधीनगर पूल ते एससी मोटरकडे जाणाऱ्या महामार्गावरील पुलापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्यावर एकाही ठिकाणी पथदीपाची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना अंधारातूनच मार्गक्रम करावे लागते. तर रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश डोळ्यावर पडत असल्याने वाहन बाजूला घेण्याच्या भरात अपघात घडत आहेत. यामुळे रात्रीच्यावेळी वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ठेकेदाराकडून बाजूपट्ट्यांकडे दुर्लक्ष
महामार्गाची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराकडून सदर खचलेल्या बाजूपट्ट्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हे अपघात घडत आहेत. याची त्वरित दखल घेऊन वाहनधारकांना होणारी अडचण दूर करावी. तसेच गांधीनगर पूल ते महामार्गावरील एससी मोटर्सकडे जाणाऱ्या पुलापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्यावर पथदीप बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही वाहनधारकांतून केली जात आहे.