आटपाडी प्रतिनिधी
कोविडच्या महामारीनंतर दोन वर्षानंतर खरसुंडीतील सिध्दनाथ देवाची यात्रा भाविकभक्तांच्या अलोट उत्साहात बुधवारी पार पडली. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रसह लाखों भाविकांनी गुलाल-खोबऱयांची उधळण करत ’नाथबाबाच्या नावानं चांगभल’चा गजर केला. कडाक्याचे ऊन आणि भक्तीच्या सरीत श्री क्षेत्र खरसुंडी न्हावुन निघाली. गुलाबी रंगात बेधुंद झालेल्या भाविकांच्या उत्साहात चैत्री यात्रा संपन्न झाली.
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे चैत्र शुध्द अष्टमीपासून सिध्दनाथ देवाच्या यात्रेला सुरूवात झाली. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी श्री.जोगश्वरी मंदिर परिसरात सिध्दनाथांचा व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळय़ानिमित्त असणारा वरातीचा सोहळा म्हणजेच सासनकाठी व पालखी सोहळा होय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेंशसह देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या लाखो सिध्दनाथ भक्तांनी सोहळय़ात सहभागी मंगळवारपासुनच खरसुंडीमध्ये हजेरी लावली.
मध्यरात्रीपासूनच नाथाच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या. पहाटेपासूनच नाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. विविध गावातून आलेल्या मानाच्या हजारो सासनकाठय़ानी देवाच्या दर्शन व भेटीसाठी मंदिर आवारात गर्दी केली. उंच सासनकाठय़ा आसमंतात डोलत होत्या. वाजत-गाजत सासनकाठ्य़ा नाचविल्या जात होत्या. या सासनकाठ्य़ांवर भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करत होते. त्याचा आनंद घेत लाखो भाविक गुलालात न्हावुन गेले.
मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्य़ाला सुरूवात झाली. विविध गावचे मानकरी, भाविकभक्तांसह पालखी जागेश्वरी मंदिराकडे निघाली. तत्पुर्वी सासनकाठय़ा मुख्य पेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे निघाल्या. सकाळपासून सासनकाठ्य़ा घेवून भाविक ’सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’चा जयघोष करत होते. दोन वर्षे सिध्दनाथाच्या यात्रेची उत्सुकता लागलेल्या भक्तांनी नाथाच्या भेटीने अतुरतेने जयघोषासह गुलालात चिंब होत सासनकाठय़ा खांद्य़ावर घेवून नाचविल्या.
25 फुटापासून 100 फुट उंचीच्या सासनकाठय़ा नाथनगरीत नाचत होत्या. भाविक या सासनकाठय़ांचे दर्शन घेवून त्यावर शेकडो पोती गुलाल-खोबऱयाची उधळण करत होते. उधळण झालेल्या गुलाल-खोबऱयाचा प्रसाद घेण्यासाठीही अबालवृध्द भाविकांची झुंबड उडत होती. दुपारी सिध्दनाथाची पालखी जोगेश्वरी देवीच्या भेटीसाठी निघाली. यावेळी अबाल-वृध्द बेभान होवून नाथाच्या भक्तीत दंग झाले होते. सर्वत्र नाथबाबाचा जयघोष होत होता.
सिध्दनाथांची पालखी मंदिरातून बाहेर पडताच जयघोष आणि गुलालाच्या उधळणीचा वेग वाढला. मुख्य पेठेतून पालखी जोगेश्वरी मंदिराकडे रवाना झाली. आणि देवाची पालखी देवीच्या भेटीसाठी निघालेला क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी उंच इमारतींवर उभे राहुन हा सोहळा अनुभवला. जोगेश्वरी मंदिरात पालखी पोहचताच सासनकाठय़ा पालखीस टेकवुन मानवंदना देण्यात आली.
यात्रेत अनेक भाविकांनी पिण्याच्या पाण्याची, सरबत, फराळासह मिष्ठान्नाची सोय केली होती. त्याचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. उन्हाच्या तीव्रतेची तमा न बाळगता भाविकांनी खरसुंडी सिध्दनाथाच्या यात्रेचा सोहळा व्दिगुणीत केला. आटपाडीसह विविध आगाराने भाविकांच्या सोयीसाठी जादा गाडय़ांची सोय केली होती. पोलीसांनीही कडक बंदोबस्त तैनात केला.
दोन वर्षानंतर तोच उत्साह
कोविडच्या संकटामुळे दोन वर्षे यात्रा-उत्सवांना ब्रेक लागला. टाळेबंदी लागु झाली. अनेकांना देवदर्शनही घेता आले नाही. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सिध्दनाथ यात्रेची उत्सुकता भाविक भक्तांमध्ये होती. भाविकांच्या अलोट उत्साह आणि गर्दीने खरसुंडी सिध्दनाथ देवाची चैत्री यात्रा ’सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात संपन्न झाली आणि दोन वर्षानंतरही तोच उत्साह कायम असल्याचे गुलाल-खोबऱयाच्या उधळणीतुन स्पष्ट झाले.