730 कोटी रुपयांची होणार उभारणी : बांधकाम क्षेत्रातील कंपनी
वृत्तसंस्था/ मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी सिग्नेचर ग्लोबलचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. सिग्नेचर ग्लोबल यांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ शेअरबाजारामध्ये सबक्रीप्शनसाठी खुला होणार आहे. सदरच्या नव्या आयपीओमार्फत कंपनी 730 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
समभाग किंमत, गुंतवणूक किती
20 सप्टेंबर रोजी खुला होणारा आयपीओ 22 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी समभागाची किंमत 366-385 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. कंपनी आयपीओ अंतर्गत 38 समभागांचा लॉट जारी करणार आहे, यामध्ये गुंतवणूक करायची झाल्यास कमीत कमी 14630 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
समभागांचे सादरीकरण
कंपनी 603 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग आयपीओअंतर्गत सादर करणार आहे. सध्याच्या प्रवर्तक आणि समभागधारकांकडून 127 कोटी रुपयांचे समभाग सादर केले जातील. 75 टक्के इतके आयपीओअंतर्गत समभाग पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कंपनीचे समभाग 4 ऑक्टोबर रोजी बाजारामध्ये लिस्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते.
कंपनीची ओळख
सिग्नेचर ग्लोबल ही दिल्ली-एनसीआरमधील सर्वात मोठी बांधकाम क्षेत्रातील विकासक कंपनी असून मुख्यता अफोर्डेबल हाऊसिंग प्रकल्पांवर अधिक करून लक्ष देत असते. चाळीस लाख रुपये किमतीपर्यंतची घरे आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी घरांची बांधणी करून देण्यामध्ये कंपनी कार्यरत आहे