फिरोज मुलाणी / औंध :
महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात पहिल्या दिवसापासून सुरू झालेली धक्कादायक निकालाची मालिका आज चौथ्या दिवशी उपउपांत्य आणि उपांत्य फेरीत देखील कायम राहिली. माती गटातील अंतिम फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड परस्परांशी भिडणार आहेत. तर गादीवर पुण्याचा शिवराज राक्षे आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे.
माती गटातील सिकंदर शेख विरुद्ध बालारफिक शेख यांच्यातील उपांत्य फेरीतील चुरशीच्या लढतीत बालारफिकने एकेरी पट काढीत दोन गुणाने खाते उघडून आक्रमण लढतीचे इरादे स्पष्ट केले. मात्र, सावध पवित्रा घेत सिकंदरने ताबा घेऊन दोन गुणाबरोबर बालारफिकला भारंदाज डावावर धोकादायक स्थितीत नेहून चितपट केले. धक्कादायक पराभवामुळे बालारफिकचे डबल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले आहे. उपांत्य फेरीतच सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सलामीला आक्रमक होत कोल्हापूरच्या शुभम सिदनाळेला बाहेरील टांग लावून घरचा रस्ता दाखवला. उपांत्य फेरीतील दोन्ही कुस्तीचा निकाल काही क्षणात लागल्यामुळे उपस्थित कुस्तीशौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
गादी गटातील अंतिम फेरीत शिवराज राक्षे (पुणे) आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (नाशिक) यांच्यात अंतिम मुकाबला होणार आहे. शिवराज वजनाने भारी आहे. मात्र हर्षवर्धन अनुभवी आहे. दोघेही मल्ल अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
उपांत्य फेरीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील पुण्याचा तुषार ठुबे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत रंगली. सदगीरने तुषारला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. तुषारने निष्क्रिय कुस्ती केल्याने एक गुण हर्षवर्धनला देण्यात आला. त्यानंतर कटऑफमुळे हर्षवर्धनांच्या खात्यात आणखी एक गुणाची भर पडली तुषारच्या निष्क्रिय खेळामुळे हर्षवर्धन सदगीरला गुण मिळाल्याने पहिल्या फेरीत हर्षवर्धनने ३ -० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने तुषारवर ताबा मिळविताना अजून दोन गुण वसूल केले आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या लढतीत मूळचा पुणे मात्र नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत करून गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत शिवराजने तीन वेळा गणेशला नियंत्रण रेषेच्या बाहेर काढून ३ गुणांची कमाई केली. गणेशने देखील एकदा शिवराजला बाहेर ढकलत एक गुण वसूल केला. शिवराजने दुहेरी पट काढून २ गुण मिळवीत ५-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत मात्र शिवराजने आक्रामक खेळ करताना गणेशवर ताबा मिळवत दोन, झोळी डावावर दोन आणि कुस्ती धोकादायक स्थितीत नेवून २ असे तब्बल ६ गुण वसूल करताना गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवराज आज अतिशय आक्रमपणे आखाड्यात लढताना दिसला.
उपउपांत्य फेरीत माती गटात सिकंदर शेख आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर समोरासमोर उभे ठाकले होते. मात्र आजच्या लढतीत सिकंदरने प्रकाशला वरचढ होऊ दिले नाही. सुरवातीपासून एकरे पट, दुहेरी पट काढून सातत्याने गुणफलक हालता ठेवून तांत्रिक गुणाधिक्याने एकतर्फी लढत जिंकून गतवर्षी सातारला अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा पूरेपूर वचपा काढला. महेंद्र गायकवाडपुढे लातूरच्या उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळकेची मात्रा चालली नाही. महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखने कोल्हापूरच्या नवख्या अरुण बोंगार्डेवर मात केली. बाला रफिक शेखने आपल्या नावाला साजेसा खेळ करताना कोल्हापूरच्या अरुण बोंगार्डेला ७-० असे पराभूत केले. दोन्ही निर्णायक फेरीत नवख्या अरुणला गुणाचे खाते उघडण्याची संधी मिळून दिली नाही.शुभम सिदनाळेने सांगलीच्या संदीप मोटेची आगेकूच थांबवीत त्याच्यावर चार विरुद्ध शुन्य गुणांनी विजय मिळवला.
गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने वाशीमच्या वैभव मानेला ५-० असे नमवले. पुण्याच्या तुषार डुबेने सोलापूरच्या अक्षय मंगवडेला २-० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. हिंगोलीच्या गणेश जगतापला सांगलीच्या सुबोध पाटीलने झुंजवले तरी देखील गणेशने ५-० अशी बाजी मारून आपली आगेकूच कायम ठेवली. पुण्याच्या बलदंड ताकदीच्या शिवराज राक्षेने माऊली कोकाटेला १० -० असे एकतर्फी पराभूत केले.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे सात जण उपउपांत्य फेरीत लढले
महाराष्ट्र केसरीची उपउपांत्य फेरी अतिशय चुरशीची झाली. मात्र माती गटात महेंद्र गायकवाड सोलापूर, शैलेश शेळके लातूर, वैभव माने, तसेच गादी गटात तुषार ठुबे पुणे हर्षवर्धन सदगीर नाशिक, शिवराज राक्षे पुणे, गणेश जगताप हिंगोली हे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सराव करणारे अर्जूनवीर काकासाहेब पवार यांचे पट्टे समोरासमोर उभे ठाकले होते.
धक्कादायक निकाल
आजच्या अतिशय अटीतटीच्या थरारक लढतीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. शिवराजने माऊली कोकाटेची विजयी घोडदौड रोखली. माऊलीने गुरुवारी महाराष्ट्र केसरी प्रुथ्वीराज पाटील याला पराभवाचा धक्का देत खळबळ उडवून दिली होती. तर सिकंदरने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर बरोबर महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखलाही पराभवाचा धक्का दिला.