वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळातर्फे प्रत्येक महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूची निवड केली जाते. ही निवड करताना सदर क्रिकेटपटूंच्या विविध स्पर्धातील कामगिरीचा आढावा घेतला जातो. या योजनेंतर्गत ऑगस्ट महिन्यातील झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तसेच ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा यांची अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयसीसीतर्फे सोमवारी ही घोषणा करण्यात आली. झिम्बाब्वे संघातील फलंदाज सिकंदर रझाने गेल्या काही स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले. तसेच ऑस्ट्रेलियन महिला संघातील अष्टपैलू ताहलिया मॅकग्राने दर्जेदार कामगिरी केल्याने आयसीसीतर्फे या दोन्ही क्रिकेटपटूंची ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घोषणा केली.
झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील झालेल्या मालिकेत तसेच हरारेमध्ये भारताविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सिकंदर रझाने दर्जेदार कामगिरी केली. बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेने 2-1 असा ऐतिहासिक विजय नोंदविला. या मालिकेत अष्टपैलू सिकंदर रझाने दोन नाबाद शतके (नाबाद 135, नाबाद 117) झळकविली. त्यानंतर झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने आणखी एक शतक झळकविले. 2022 च्या क्रिकेट हंगामामध्ये रझाची फलंदाजी चांगलीच बहरली असल्याचे जाणवते. गोलंदाजीत त्याने टी-20 प्रकारात ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत 7 गडी बाद केले. आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्याला देण्यात येणारा हा पुरस्कार मिळविणारा सिकंदर रझा हा पहिला झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू आहे. ऑगस्ट महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कार शर्यतीमध्ये प्रामुख्याने सिकंदर रझा, न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल सँटनर आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण रझाने स्टोक्स आणि सँटनर यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळविला. या पुरस्काराबद्दल सिकंदर रझाने आयसीसीचे आभार मानले आहेत.
महिलांच्या विभागात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ताहलिया मॅकग्राने ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकाविला. मॅकग्राने बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. ऑस्ट्रेलियन महिला संघातील ऍलिसा हिली हिची कामगिरीही या स्पर्धेत दर्जेदार झाली होती.. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मॅकग्राने 57 धावांच्या सरासरीने 114 धावा जमविल्या. तसेच गोलंदाजीत तिने 13.40 धावांच्या सरासरीने 5 बळी मिळविले. पाकविरुद्ध झालेल्या मालिकेत मॅकग्राची कामगिरी दर्जेदार झाली होती. पाक विरुद्धच्या सामन्यात मॅकग्राने नाबाद 78 धावा तसेच गोलंदाजीत 3 गडी बाद केले आणि क्षेत्ररक्षण करताना एका फलंदाजाला धावचीत केल्याने ऑस्ट्रेलियाने आपली विजयी घोडदौड कायम राखली होती.
महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची मॅकग्रा ही जागतिक स्तरावरील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. 26 वषीय मॅकग्राने अनेक प्रमुख स्पर्धांमध्ये आपल्या संघाच्या विजयाला सातत्याने हातभार लावला आहे. ऑगस्ट महिन्यासाठी महिलांच्या क्रिकेट विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड करण्याच्या शर्यतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्राने आपल्याच संघातील बेथ मुनी आणि भारताची जेमिमा रॉड्रिग्ज यांना मागे टाकले.