वृत्तसंस्था /दुबई
भारताचा वेगवान गोलंदाज मोहमद सिराजने आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली आहे. लंकेत नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेंत अंतिम सामन्यात मोहमद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान लंकेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करून जेतेपद मिळवले होते. आशिर्य चषक स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीमुळे वेगवान गोलंदाज मोहमद सिराजचे मानांकनातील स्थान आठ अंकांनी वधारले आणि तो पुन्हा अग्रस्थानावर आरुढ झाला आहे.
आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात मोहमद सिराजने 21 धावात 6 गडी बाद केले. तसेच त्याने एका षटकात लंकेचे चार फलंदाज बाद केले होते. सिराजची वनडे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी म्हणून गणली गेली. या अंतिम सामन्यात भारताने लंकेला केवळ 50 धावात उघडले होते. संपूर्ण स्पर्धेमध्ये सिराजने 12.2 धावांच्या सरासरीने 10 गडी बाद केले. गेल्या मार्चमध्ये मोहमद सिराज आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकनात पहिल्या स्थानावर होता पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवुडने सिराजला मागे टाकले. सिराजने या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा बोल्ट, अफगाणचा रशीद खान आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांना मागे खेचले आहे.
आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत सिराज पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंडचा बोल्ट दुसरा, अफगाणचा रशीद खान तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा स्टार्क चौथ्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेच्या केशव महाराजने दुखापतीनंतर आपले ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दणकेबाज पुनरागमन केले आहे. या मालिकेत केशव महराजने पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी करत द. आफ्रिकेला मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याने या वनडे मालिकेत 16.87 धावांच्या सरासरीने आठ गडी बाद केले आहेत. आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या यादीत द. आफ्रिकेच्या क्लासनने आपल्या अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवल्याने या मानांकन यादीत बरेच फेरबदल झाले आहेत. या कामगिरीमुळे क्लासनने फलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडचा डेविड मलान पहिल्या स्थानावर आहे.