वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जामीन मिळाल्यानंतरही दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आपल्या आजारी पत्नीला भेटू शकले नाहीत. पत्नी सीमा सिसोदिया यांना भेटण्यासाठी ते शनिवारी सकाळी घरी पोहोचले. मात्र, ते निवासस्थानी येण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सिसोदिया यांना घरी जाऊन पत्नीला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती, मात्र न्यायालयाने त्यांना रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे जामीन मिळूनही सिसोदिया आपल्या पत्नीला भेटू शकले नाहीत.
पोलीस बंदोबस्तात सिसोदिया घरी
न्यायमूर्ती दिनेश शर्मा यांच्या खंडपीठाने तिहार तुऊंग अधीक्षकांना सिसोदिया यांना त्यांच्या घरी नेण्याचे आदेश दिले होते. तुरुगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिसोदिया यांना सकाळी नऊच्या सुमारास पोलीस सुरक्षेत घरी नेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांना कारागृहात परतावे लागणार होते. या काळात सिसोदिया प्रसारमाध्यमांशी बोलणार नाहीत, मोबाईल किंवा इंटरनेट वापरणार नाहीत, तसेच कुटुंबीयांशिवाय इतर सदस्यांना भेटणार नाहीत, अशा अटी न्यायालयाने घातल्या होत्या.
सीमा सिसोदिया मल्टिपल स्केलेरोसिसने त्रस्त
मनीष सिसोदिया यांच्या पत्नी सीमा सिसोदिया यांना मल्टीपल स्केलेरोसिसचा त्रास आहे. या आजारामुळे शनिवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.