ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कथित दारू घोटाळय़ातील आरोपी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारू उत्पादकांसाठी नियमावली लीक केली तसेच दारू उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. सिसोदिया यांना या प्रकरणात तपासात सहकार्य न केल्यामुळे 26 फेब्रुवारीला 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती.
मंगळवारी न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर ईडीचा जबाब मागवला. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी ईडीला नोटीस बजावली असून, 25 मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. 17 मार्चला न्यायालयाने सिसोदियांच्या कोठडीत 22 मार्चपर्यंत पाच दिवसांची वाढ केली होती. ती मुदत आज संपली. त्यांना आज राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.