भाजपमध्ये प्रवेश केल्यास चौकशी बंद करण्याची ऑफर मिळाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या नव्या अबकारी धोरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर सीबीआय चौकशीच्या कक्षेत आलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भाजपने मला ‘आप’मध्ये फूट पाडत पक्षप्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यास सीबीआय, ईडीची चौकशी बंद करू असा भाजपच्या संदेश मिळाला आहे. परंतु मी महाराणा प्रताप यांचा वंशज अन् राजपूत आहे. शीर कापून घेईन परंतु भ्रष्टांसमोर झुकणार नसल्याचा दावा सिसोदियांनी केला आहे.
तर दुसरीकडे मद्य घोटाळय़ावरून भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत. उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना पदावरून हटविण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.
सिसोदियांच्या सीबीआय चौकशीवरून आम आदमी पक्षाने जातीचे कार्ड पुढे केले ओहे. सिसोदियांना महाराणा प्रताप यांचे वंशज ठरवत आम आदमी पक्षाने वेगळाच प्रचार चालविला आहे. महाराणा प्रताप यांच्या वंशजांना भाजप खोटय़ा आरोपात अडकवून त्रास देत आहे. यामुळे गुजरातच्या राजपूत समुदायात संताप असल्याचे ‘आप’चे संयुक्त महासचिव अन् गुजरातमधील पक्षाचे नेते इसुदान गढवी यांनी म्हटले आहे.
चालू वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणूक होणार असल्याने आम आदमी पक्ष सिसोदियांना प्रामाणिक आणि चांगला शिक्षण मंत्री ठरवत बचाव करत आहे. तर त्यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित करत राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमध्ये राजपूत समुदायाच्या सहानुभूतीचा लाभ होण्याची अपेक्षा पक्षाला आहे.
बस खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप
सीबीआयने दिल्ली सरकारला आणखी एक झटका दिला आहे. तपास यंत्रणेने आता 1000 लो-फ्लोर बसेसच्या खरेदीत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून प्रारंभिक तपास सुरू केला आहे. दिल्ली सरकारने बसखरेदीत भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. जून महिन्यात तत्कालीन उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडून स्थापन तीन सदस्यीय समितीने बसेसच्या खरेदीच्या करारात त्रुटी असल्याचे म्हणत हा करार संपुष्टात आणण्याची शिफारस केली होती.