काँग्रेसची मागणी : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
प्रतिनिधी /म्हापसा
आसगांव येथील सिली सोल्स ऍण्ड कॅफे या केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती ईराणी यांच्या कुटुंबियांच्या कथित बेकायदेशीर बार ऍण्ड रेस्टॉरंट विरोधात काँग्रेसने आसगांव येथे बारच्यासमोर निदर्शने केली. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करावी. ईराणी यांच्या या वृत्तीचा निषेध करीत बार सील करण्याची मागणी केली व पोलिसांना कुलूप भेट देण्यात आले.
या रेस्टॉरंट प्रश्नी ईराणी यांनी खरे बोलावे, गैरकृत्ये लपवू नका, या बारचा अबकारी परवाना म्हणजे घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला. या विषयावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गप्प न बसता स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, मंत्री ईराणी यांचे आसगांव येथील बार ऍण्ड रेस्टॉरंट बेकायदेशीर आहे. ते आता रेस्टॉरंट चालवत नसल्याचे सांगत असले तरी त्यांनी सोशल मीडियावर रेस्टॉरंट आपलेच असल्याचा पोस्ट केला होता. त्यामुळे खरे काय ते त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी केली. तसेच अबकारी अधिकाऱयांच्या बदलीचा प्रयत्न सुरु आहे, तसे झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी निदर्शने करणाऱयांनी गेटला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले. नंतर ते कुलूप त्यांनी पोलिसांना भेट दिली.
त्या रेस्टॉरंटच्या कागदपत्रांची पडताळणी करुन सांगतो : सदानंद तानावडे
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबाबत आपण काल पेपरमध्ये वाचले. त्यांची पत्रकार परिषदही पाहिली. त्यांना जे काही सांगायचे आहे ते त्यांनी सांगितले आहे त्यावर आपण बोलणे योग्य नाही. त्या रेस्टॉरंटची कागदपत्रे पाहिल्यावरच ते कोणाचे आहे, कोण चालवत आहे हे समजेल. त्यामुळे ते पाहिल्यावरच आपणच प्रतिक्रिया व्यक्त करणार, असे गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.