पणजी : हिंदवी स्वराज्य संघटना फोंडातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाटो पणजीच्या संस्कृती भवनच्या कला दालनात शिवकर्णिका प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप यांच्याहस्ते झाले. गोव्यातील 23 प्रतिभावंत चित्रकारांनी रेखाटलेली शिवरायांची विविध रूपे, शिवकालीन प्रसंगांचा प्रतिकात्मक आविष्कार पाहाणे म्हणजे आनंदानुभूतीच. हे प्रदर्शन पाहाताना ऊर अभिमानाने भरून येतो. सागर नाईक मुळे, वितेश नाईक, विराज नाईक, राजेश साळगावकर, सचिन नाईक, वासुदेव शेट्यो, आधी विशाल, विजय भंडारे, रामदास गडेकर, स्वप्नेश वायंगणकर, श्रीधर कामत बांबोळकर, चैताली मोरजकर, प्रविण नाईक, डॉ. शिवाजी शेट, ईशान नाईक, श्रीपाद गुरव, सिद्धार्थ गायतोंडे, सोनिया रॉड्रीगीस सबरवाल, संतोष मोरजकर, शिल्पा नाईक मोरजकर, प्रदीप नाईक, सिद्धार्थ गोसावी व निऊपा नाईक या चित्रकारांचे कौशल्य इथे पहायला मिळते.
सागर मुळे यांनी मंदिराची पार्श्वभूमी घेऊन शिवप्रतिमा साकारली आहे. विजय यांनी, शिवाजीने अफझलखानाचा कोथळा काढला त्या प्रसंगावर वाघनखे घातलेला रक्ताळलेला हात दाखवून प्रतिकात्मक आविष्कार घडविला आहे. चैताली यांनी, तोंडात सुरा असलेला घोडा आणि मागे किल्ला अशी कल्पक चित्रकृती साकारली आहे.डॉ. शिवाजी शेट यांनी विरश्रीयुक्त रणमैदानावरील शिव प्रतिमा छान साकारली आहे. निऊपा नाईक यांची साकारलेली कल्पक आणि कलात्मक शिवप्रतिमा लक्षवेधी आहे. वासुदेव शेट्यो यांची कोलाज सदृश्य प्रतिमा आणि विराज नाईक आणि प्रविण नाईक यांच्या चित्रकृती प्रभावी आहेत. सन्माननीय पाहुणे विराज नाईक, संस्थेचे अध्यक्ष वासुदेव नाईक, सचिव केशव शिरोडकर, कोषाध्यक्ष कपिल नाईक उत्कर्ष नाईक यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन आज गुरूवार दि. 8 रोजीपर्यंत रसिकांसाठी खुले आहे.