पुणे / प्रतिनिधी :
आयपीएल क्रिकेट मॅचवरील बेटिंगप्रकरणी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील खराडी भागातील ‘गॅलक्सी वन’ या सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकत छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील 6 मोठय़ा बुकींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने येथे जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 16 मोबाईल हॅन्डसेट, 2 लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 80 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जसप्रित मनजिंदरसिंग सिंह (वय 29, मूळ रा. रस्ता नं. 10, शिवाजीनगर, लुधियाना, पंजाब), तरणदीप बलजींदर सिंह (33, रा. शास्त्री स्कुलवाडी गल्ली, शिवाजीनगर, लुधीयाना, पंजाब), गौरव दयाराम धरमवाणी (27, मूळ रा. ब्लॉक शिवानंदनगर, खमतराई, रायपूर, छत्तीसगड), सुनीश तुलशीदास लखवानी (25, मूळ रा. महाविर स्कुल, गुडीयारी, रायपूर, छत्तीसगड), आणि लालकिशोर दुखी राम (37, मूळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार), जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा (25, मूळ रा. सिंधी गुरूव्दाराजवळ, रायपुर, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींसह डीके नावाच्या बुकीवरदेखील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका सासोयटीमधील एका फ्लॅटमध्ये मोठय़ा प्रमाणावर क्रिकेट बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली होती. याबाबत मिळालेल्या माहितीची खातरजमा पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिस पथकाने खराडी येथील गॅलक्सी वन सोसायटीमधील नवव्या मजल्यावर फ्लॅट नंबर ए-902 वर छापा टाकला. आरोपींकडे आढळलेल्या लॅपटॉपमध्ये वेगवेगळय़ा वेबसाईटद्वारे टाटा आयपीएल 2023 च्या मुंबई इंडियन्सविरूद्ध लखनौ सुपर जायंट्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतले जात होते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत, पोलिस हवालदार बाबा कर्पे, पोलीस हवालदार भिवरकर, पोलिस अंमलदार संदीप कोळगे, पोलिस अंमलदार अजय राणे, पोलिस अंमलदार सागर केकाण, पोलिस अंमलदार अमेय रसाळ, पोलिस अंमलदार किशोर भुजबळ, पोलिस अंमलदार ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.