वृत्तसंस्था/ गोल्डकोस्ट
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू गॅरेथ मॉर्गनने सहा चेंडूत सहा गडी बाद करण्याचा नवा विक्रम क्रिकेट क्षेत्रात नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियातील थर्ड डिव्हिजन क्लब स्तरीय क्रिकेट स्पर्धेत मॉर्गनने स्थानिक सामन्यात हा पराक्रम केला.
गोल्डकोस्ट प्रिमियर लिग थर्ड डिव्हिजन क्लबस्तरीय क्रिकेट स्पर्धेत येथे झालेल्या स्थानिक सामन्यात मडगीरेबा नेरांग जिल्हा क्रिकेट क्लब संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या गॅरेथ मॉर्गनने सर्फर्स पॅराडाईज सीसी क्लबचे सहा फलंदाज सहा चेंडूत बाद केले. 40 षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मडगीरेबा नेरांग क्लबने 178 धावांचे आव्हान सर्फर्स र्पाडाईजला दिले होते. पण मॉर्गनच्या कामगिरीने या सामन्याचे चित्रच पालटले. सर्फर्स पॅराडाईजचा डाव 174 धावात आटोपला. मॉर्गनने एका षटकात सहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यापैकी पाच फलंदाजांना आपले खाते उघडता आले नाही. मॉर्गनच्या या षटकात पहिले चार फलंदाज झेलबाद झाले तर शेवटचे दोन फलंदाज त्रिफळाचीत झाले. मॉर्गनने या सामन्यात 7 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात 7 गडी बाद केले. तसेच फलंदाजी करताना मॉर्गनने 39 धावांचे योगदान दिले.
व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आतापर्यंत एका षटकात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम न्यूझीलंडच्या वॅग्नरने तसेच त्यानंतर बांगलादेशच्या अल अमीन हुसेनने आणि भारताच्या अभिमन्यू मिथुनने 2019 साली कर्नाटकातर्फे नोंदविला होता.