बेळगाव, कोल्हापूर, मिरज येथील महिला
बेळगाव : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मंगळसूत्र, पर्स पळविणाऱ्या सहा महिलांना मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे दीड लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव, कोल्हापूर व मिरज येथील महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन चोरी प्रकरणांचा छडा लावला असून रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, पोलीस उपनिरीक्षक आय. एम. हिरेगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव, कोल्हापूर व मिरजहून यरगट्टी बसस्थानकावर जाऊन बसमध्ये चढताना प्रवासी महिलांची पर्स, त्यांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याचे गुन्हे या महिला करीत होत्या. दोन प्रकरणात या महिलांनी चोरलेले दीड लाख रुपये किमतीचे 25 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसांचे कौतुक केले आहे.