वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू झालेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सैन्यमने सुवर्णपदक पटकावत पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवून दिले. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात तिने हे सुवर्णयश मिळविले.
अंतिम फेरीत आठ महिलांचा सहभाग होता. अटीतटीच्या झालेल्या या फेरीत सैन्यमने दर्जेदार कौशल्याचे प्रदर्शन करीत 238 गुणांसह पहिले स्थान मिळविले. तिची देशवासी सुरुची इंदर सिंगला मात्र या प्रकारात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 154.1 गुणांची नोंद केली. कोरियाच्या किम मिन्सेवने 236 गुणांसह रौप्य व तैपेईच्या लियु हेंग यु हिने 216.9 गुणांसह कांस्यपदक मिळविले. त्याआधी पात्रता फेरीत सैन्यमने तिसरे स्थान मिळविताना 571 गुणांची नेंद केली तर सुरुचीने पाचवे स्थान मिळविले होते. सैन्यमने गेल्या फेब्रुवारीत खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात कांस्य मिळविले होते.