12 ते 15 सेकंदात ‘काम फत्ते’ः ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी ठराविक अंतरावरून लोकांची टेहळणी
नोएडा / वृत्तसंस्था
नोएडाच्या सेक्टर 93 मध्ये बांधलेले ‘सुपरटेक’ कंपनीचे बेकायदेशीर ट्विन टॉवर पूर्वनियोजनाप्रमाणे रविवारी दुपारी 2.30 वाजता पाडण्यात आले. 100 मीटरपेक्षा जास्त उंचीचे दोन्ही टॉवर पडायला फक्त 12 ते 15 सेकंद लागले. अवघ्या काही सेकंदात नोएडाचा ट्विन टॉवर जमीनदोस्त होतानाचे दृश्य अनेकांनी ‘आँखो देखा’ पाहिले. तर, बऱयाच जणांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या किंवा प्रसारमाध्यमांच्या आधारे गगनचुंबी इमारत भुईसपाट होताना पाहिली. आता दोन्ही 32 आणि 29 मजली इमारती पूर्णपणे ढिगाऱयात बदलल्या आहेत.
एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी 46 जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटके लावण्याचे काम करत होती. स्फोटकांच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात ऍपेक्स आणि सियान नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. काही सेकंदामध्ये बहुमजली टॉवर्स कोसळल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले होते. टॉवरमध्ये स्फोट सुरू होताच धुळीचे ढग उठू लागले. अनेक किलोमीटर दूरवरूनही लोकांनी धुळीचे हे लोट पाहिले. या पाडकामानंतर जवळपासच्या 50 हून अधिक इमारती धुळीने माखल्या आहेत. तसेच बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर याचा मोठा ढिगारा तयार झाला आहे. आता पुढील दोन-तीन महिने ढिगारा हटविण्याचे काम चालणार आहे. खरेदीदारांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या निकालाअंती ट्विन टॉवर म्हणजे ऍपेक्स (32 मजली) आणि सियान (29 मजली) टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.
2.30 वाजता पहिला स्फोट, अन् काही सेकंदात…
ट्विन टॉवर पाडण्याची संपूर्ण व्यवस्था गेल्या काही दिवसांपासूनच सुरू करण्यात आली होती. 500 मीटरच्या आत येणाऱया सर्व इमारती रिकामी करण्यात आल्या. अनेक इमारतीही झाकल्या गेल्या. दुपारी 2.30 वाजता पहिला स्फोट झाला. 29 मजली इमारतीच्या तळाशी हा स्फोट झाला. यानंतर 29 मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकामागून एक स्फोट झाले. काही सेकंदात ही 29 मजली इमारत कोसळली. त्यानंतर काही वेळातच 32 मजली इमारतीत स्फोट सुरू झाले. त्याची सुरुवातही इमारतीच्या तळापासून झाली. अवघ्या 12 सेकंदात दोन्ही इमारती ढिगाऱयात बदलल्या. स्फोटांची प्रक्रिया पूर्ण होताच ऑपरेटरने स्मॉग गनच्या तंत्रज्ञानाने धूर काढण्याचे काम सुरू केले होते.
सर्व पाडकाम पूर्णपणे सुरक्षित
स्फोटापूर्वी सुमारे 7 हजार लोकांना स्फोट झोनमधून बाहेर काढण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, ट्विन टॉवर्सच्या अगदी जवळ बांधलेल्या बहुमजली इमारतींचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या ट्विन टॉवर्सची पडझड पाहण्यासाठी लोकांना खूप उत्सुकता होती. ही कारवाई पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक काही किलोमीटर अंतरावरील इमारतींच्या छतावर चढल्याचे निदर्शनास येत होते. यादरम्यान कंपन कमी करण्यासाठी दोन्ही इमारतींच्या खाली रबरी टायर विखरून ठेवण्यात आले होते.
बंदोबस्त, खबरदारी चोख
टॉवर पडल्यानंतर प्रशासनाची मंजुरी मिळेपर्यंत 5 मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. नोएडा पोलिसांचे हजारहून अधिक कर्मचारी येथे सज्ज होते. तसेच आपत्कालीन स्थितीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. स्फोटानंतर परिसरातील प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष डस्ट मशीन बसवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने ट्विन टॉवर्सभोवती सहाहून अधिक तात्पुरत्या मशीन्स बसवल्या आहेत. त्यांच्या मदतीने ही टीम 31 ऑगस्टपर्यंत वायू प्रदूषणावर लक्ष ठेवणार आहे. दररोज सकाळी 10 वाजता वायू प्रदूषणाची आकडेवारी जाहीर केली जाईल. तसेच, इतर मशिनमधूनही हवा गुणवत्ता निर्देशांक पाहिला जाईल.
परिसरात धुळीचे साम्राज्य
ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी वापरण्यात आलेले स्फोटाचे तंत्र अद्वितीय होते. कारण जवळपासच्या कोणत्याही इमारतींचे नुकसान झाले नाही. दाट लोकवस्तीच्या मध्यभागी बांधलेले दोन्ही टॉवर आपापल्या जागी जमीनदोस्त झाले आणि जवळपासच्या इमारतींवर फक्त धुळीचे ढग पोहोचले. एक्स्प्रेस वेपर्यंत लोकांनी धुराचे हे लोट पाहिले. एवढी उंच इमारत पाडण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती. धूळ कमी करण्यासाठी सतत पाणी शिंपडले जात होते. धुळीचे साम्राज्य कमी झाल्यानंतर तज्ञांची एक टीम नुकसानीचे मूल्यांकन करणार आहे.
आजुबाजूंच्या इमारतींचे कोणतेही नुकसान नाही
ट्विन टॉवर कोसळल्यानंतर आजूबाजूच्या इमारतींचे कोणतेही नुकसान झाले नाही. आजूबाजूच्या सर्व इमारती सुरक्षित आहेत.
– रितू माहेश्वरी, सीईओ, नोएडा प्राधिकरण
ट्विन टॉवर्सचे मालक कोण?
पाडण्यात आलेला ट्विन टॉवर सुपरटेक कंपनीने बांधला आहे. आर. के. अरोरा असे सुपरटेक कंपनीच्या मालकाचे नाव आहे. अरोरा यांनी 34 कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्या नागरी विमान वाहतूक, सल्लागार, ब्रोकिंग, पिंटिंग, फिल्म्स्, हाऊसिंग फायनान्स, बांधकाम क्षेत्रात काम करतात. आता नोएडातील ऍपेक्स आणि सियान नावाचे ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्याने ‘सुपरटेक’ला 500 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.