ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस आणण्याचा विचार सुरू आहे. स्काय वॉक बसमधून एकावेळी 250 प्रवाशी प्रवास करु शकतात. अशा प्रकारच्या बस आल्यानंतर पुण्याची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवेतून चालणाऱ्या गाडय़ांची योजना आणणार असल्याचं आश्वासन गडकरी यांनी यावेळी भाषणात दिलं.
गडकरी म्हणाले, पुण्यात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. चांदणी चौकातील कामासाठीसुद्धा वाहतूक कोंडीमुळे बरेच अडथळे आले. आता पुण्यात वाहनांची संख्या वाढवू नका. कारण या ठिकाणी खूप प्रदूषण झालं. आपल्याला पेट्रोल-डिझेलला देशातून हद्दपार करायचं आहे. त्यामुळे 40 टक्के प्रदूषण कमी होईल. दरम्यान, पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.