पालकांकडूनच स्मार्टफोन मग विचारतोय कोण? जबर दणक्यानंतरच जाग येणार का?, जागरुक होण्याची गरज
बेळगाव : सोशल मीडियाचा अतिरेकी वापर अनेकवेळा अनर्थ घडवितो. कुणाच्या बँक खात्यातील रक्कम गायब होते तर आणखी कोणाला पैशासाठी ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडतात. कित्तूर तालुक्यातील यत्तीनकेरी येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या एका विद्यार्थ्याच्या खुनाने अतिरेक कसा जीवघेणा ठरतो, हे सामोरे आले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर केलेली एखाद्याची थट्टा-मस्करी किती महागात पडते? याचा अनुभव समाजमनाला आला.
प्रज्ज्वल मल्लेश सुंकद (वय 17) रा. यत्तीनकेरी या विद्यार्थ्याचा खून झाला. मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याच्यावर तलवार हल्ला झाला होता. त्याचदिवशी रात्री त्याला बेळगाव येथील खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होस्पेट व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशाल कल्लव•र (वय 19) रा. मल्लापूर याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने केवळ कित्तूर परिसरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सोशल मीडियाचा गुलाम बनलेली तरुणाई त्याच्या वापरापेक्षा गैरवापरच कशी करते आहे? हे सामोरे आले आहे. विद्यार्थ्याच्या खुनानंतर त्याच्या गावात तेढ निर्माण झाले आहे. स्वत: काबाडकष्ट करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या प्रज्ज्वलच्या आई-वडिलांचे विश्वच उद्ध्वस्त झाले आहे. केवळ एक खूनप्रकरण असे या प्रकरणाकडे पाहता येणार नाही. कारण खुनाची कारणे लक्षात घेता सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तरुणाईला कोठपर्यंत नेऊन पोहोचवतो? हेच दाखवून दिले आहे. फेसबुक व इतर माध्यमांवर बनावट नावाने अकौंट उघडून सावजांची फसवणूक करण्याचे प्रकार काही कमी नाहीत. एखाद्या सुंदर तरुणीचे फोटो ठेवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. त्यानंतर सावजाला ठकवून त्याला ब्लॅकमेल करायचे प्रकार नेहमीच घडतात.
कित्तूरजवळील खुनाचा प्रकार वेगळ्याच कारणासाठी झाला आहे. तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर एक अकौंट उघडून त्याचेच मित्र त्याला मेसेज पाठवायचे. त्याला ते खरे वाटले. कोणी तरी तरुणी आपल्या संपर्कात आली आहे, असेच पीयुसी पहिल्या वर्षात शिकणाऱ्या प्रज्ज्वलला वाटले होते. मात्र, हा प्रकार खोटा आहे, हे समजायला त्याला वेळ लागला नाही. सोशल मीडियावर खोटारडेपणा उघडकीस आल्यानंतर प्रज्ज्वलने ते करणाऱ्यांना शिवीगाळ करून मेसेज पाठविले. त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला. तरुणीच्या नावे मेसेज पाठवून प्रज्ज्वलची फजिती करून मजा घेण्याच्या तयारीत असलेल्या त्याच्या मित्रांना प्रज्ज्वलने केलेली शिवीगाळ रुचली नाही. त्यामुळे 26 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्याला बोलाविण्यात आले. सुरुवातीला वादावादी, शिवीगाळ प्रकरणानंतर समझोताही झाला होता. तरीही विशाल व त्याचे चार अल्पवयीन मित्र यांना प्रज्ज्वलने केलेली शिवीगाळ विसरता आली नाही. त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा चर्चेसाठी त्याला बोलावून त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रज्ज्वलने अखेरचा श्वास घेतला. त्याचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात. तर आई मजुरी करते. त्याला एक भाऊही आहे. गरिबीतूनही आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या या दाम्पत्याला मुलाच्या खुनाने धक्का बसला आहे.
पालकांनी विचार करण्याची गरज
यत्तीनकेरी येथील परिस्थिती गावोगावी पहायला मिळते. हातात स्मार्टफोन आल्यानंतर त्याचा सदुपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होत असल्याने असे प्रसंग उद्भवत आहेत. खून प्रकरणात चार अल्पवयीन मुलांसह ज्या पाच जणांना अटक झाली, तेही विद्यार्थी आहेत. व्यवस्थित शिक्षण घेऊन स्वत:चे जीवन घडविण्याकडे लक्ष न देता सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आयुष्य त्यांनी बरबाद करून घेतले आहेत. प्रत्येक पालकाने याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर
इन्स्टाग्रामवरील बनावट अकौंटच्या माध्यमातून सुरू झालेली थट्टामस्करी आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यापर्यंत येऊन विद्यार्थ्यांच्या खुनापर्यंत प्रकरण पोहोचले. यावरून सोशल मीडियाचा अतिरेकी वापर काय करू शकतो? हे दिसून आले आहे. सायबर गुन्हेगार बनावट अकौंटचा वापर सावजांना आर्थिकरित्या गंडविण्यासाठी करतात किंवा त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीही वापर होतो. या प्रकरणात मात्र एका कोवळ्या जीवाचा बळी घेतला गेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियावरील मेसेजवरून सुरू झालेला वाद त्यानंतरच्या संघर्षात झालेला खून आता गावातील जाणत्यांपर्यंत पोहोचला असून सलोखा बिघडवणारा ठरला आहे.