‘कहत कबीर सुनो भई साधु’ वाल्या संत कबीरांनी माणसांना जागं करण्यासाठी बरंच काही लिहिलं आहे. ते वाचून किती माणसं जागी झाली हा एक वेगळाच विषय आहे पण सामान्यजनांना सुधारायचा वसा हाती घेतलेले संत काय आपल्या हातचं हरिनामरूपी चंदन उगाळायचं सोडतात का? ज्याला गंध घ्यायचाय तो सुवास घेईल, ज्याला स्पर्श हवा तो लेप घेईल आणि ज्याला त्या चंदनाचं अंतरंग हवं तो स्वत: झिजून चंदन होईल! एका कुंभाराला मातीची भांडी घडवताना पाहून त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.
माटी कहे कुम्हार से
तू क्या रोंधे मोय?
एक दिन ऐसा आवेगा
मैं रोंदूँगी तोय..
त्यांच्या या ओळी, महाराष्ट्रातल्या संतपंतशाहिरांच्या काव्यदुधावर पोसलेल्या एका कवीच्या हृदयात घुसल्या. मग त्यानेही सवाई रचना केली.
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी
दोन्हीही रचना गाजल्या होत्या. मूळ हिंदी रचना भजनसम्राट अनूप जलोटा यांनी गायली आहे. तर मधुकर जोशी यांनी केलेल्या या मराठी रचनेला संगीत गोविंद पोवळे यांनी दिलंय आणि सुप्रसिद्ध गायक दशरथ पुजारी यांनी ती गायलीय. गाणं या क्षेत्राने ‘माती’ या विषयालाही सोडलं नाही. उलट माती या विषयावर खरोखरच कितीतरी सुंदर सुंदर गाणी आजवर घडली आहेत. उदाहरणार्थ
इक दिन बिक जाएगा माटी के मोल
जग में रह जाएँगे प्यारे तेरे बोल.
हेच गाणं घ्या ना! द राज कपूरवर चित्रित आणि मुकेशने गायलेल्या ह्या गाण्यात मोठं सत्य सांगितलंय. पण या गाण्यातला फरकही तितकाच गमतीशीर आहे बरं का! माती असशी मातीत मिळशी, यात मातीचं मूल्य नेमकं काय? माटी के मोल म्हणजे अगदी किंमत शून्य असं असेल तर मग ‘वीर धुरंधर आले गेले, पायीं माझ्या इथे झोपले’ असं अभिमानाने म्हणणारी माती सर्वात अनमोल नाही का? आणि हे जर खरंच असेल तर मग मातीमोल होऊन जाणे म्हणजे अनमोल होणे की शून्यमोल होणे बरं? हा भलताच पेच आपल्या डोक्यात सुरू होतो. तशीही ही माती काही फुकट मिळत नाही. चांगले गगनाला भिडलेले भाव आहेत तिचे. आताच नव्हे हं! अगदी रामायण महाभारत काळापासूनच. म्हणूनच तर ‘सुईच्या टोकावर मावेल एवढी मातीसुद्धा आम्ही पांडवांना देणार नाही!’ अशी गर्जना सु(दु:)योधनाने केली होती. त्यापायी जगातलं सर्वात मोठं भारतीय युद्ध घडलं. मग मातीचं मोल नक्की किती?
माती पाणी धरून ठेवते, मातीत असंख्य प्रकारची खनिजं असतात, ज्या मातीत तेलाचे, सोन्याचे वगैरे साठे असतात ती मातीही सोन्यापेक्षा जास्त मूल्याची ठरते. थोडक्यात मातीचं मूल्य सापेक्ष आहे हे झालं वैज्ञानिक सत्य! आता थोडं मातीच्या वस्तूंच्या सौंदर्याकडे वळू. मातीपासून विविध भांडी घडतात. मूर्ती घडतात. एखाद्या सौंदर्यवतीचं वर्णन करताना
मिट्टी से खींची लकीरें रब ने
तो ये तस्वीर बनी
आग हवा पानी को मिलाया
तो फिर ये तस्वीर सजी..
इतक्या सुरेख ओळी लिहिल्या जाऊ शकतात. मूर्तिमंत सौंदर्य मातीच्या रेखांनी बनलंय अशा अर्थाच्या. धन्य ती माती. या ओळी आहेत ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘मनमोहिनी तेरी अदा’ या गीताच्या. शंकर महादेवन यांनी ज्या जोशमध्ये ते गायलंय… आहाहा! पांढऱ्या शुभ्र कपड्यांतील ती देखणी ऐश्वर्या राय म्हणजे सोनमोली माती जणू! मातीपासून घडवलेल्या देवाच्या मूर्तीपुढे माणसं नतमस्तक होतात. गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सोन्याचांदीची नव्हे तर मातीचीच मूर्ती आवश्यक असते. दुर्गापूजेतही तेच. मग माती ही माता नव्हे काय? आणि अख्ख्या दुनियेची माती मळून तिला आकार देणारा तो जगन्नियंता तरी कोण? तर चक्क वेडा कुंभार!
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार
यामध्ये
तूच घडविसी तूच फोडिसी
कुरवाळिशी तू तूच ताडिसी
म्हटलंय. म्हणजे मातीशी हा एवढा खेळ तो मांडतो तर माती ही अनमोलच म्हणायची! पुलंनी अपूर्वाई मध्ये म्हटलंय की आपण भारतीय माझी माती, माझं आकाश असं म्हणतो पण कधी मोकळ्या मनाने आभाळाखाली येत नाही आणि कधी मातीने हात भरत नाही. इंग्रज जरा वेळ मिळाला की मोकळ्या आभाळाखाली धावत येतो आणि मातीशी खेळत रहातो. पण आपल्याकडे मातीमायशी नातं जोडलेलेही खूप लोक असतात बरं का! आठवा बरं ‘गारंबीचा बापू’ मधले घाणेकर!
अजब सोहळा अजब सोहळा
माती भिडली आभाळा
असं म्हणत म्हणत डोळे भरून तो सोहळा पाहत आपल्या गारंबीच्या बागेतून हिंडणारे! शांता शेळकेंच्या लेखणीतून उतरलेलं आभाळाएवढं गीत आणि रवींद्र साठे यांचा खूप साधा, खूप धीरगंभीर आणि म्हणूनच खूप सुंदर असा स्वर!
मुकी मायबाई तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा
वाह…मातीचं असं यथार्थ वर्णन करावं तर शांताबाईंनीच! कुसुमाग्रजांची एक फार फार सुंदर कविता अशीच ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटातलं गाणं होऊन उतरली आहे. अनुराधा पौडवाल यांनी ती गायलीय.
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे?
अतिशय आर्त हाक मारणारी ती विधवा. तिचं ते मनात न मावणारं अथांग दु:ख तिच्या डोळ्यात उतरलेलं आहे. तिची आस, तिचं वैफल्य, तिची अपुरी स्वप्नं…सगळी सगळी अंगावर येतात आपल्या. तिनं मातीला गाती केलीय पण ऐकायला मात्र आकाशाच्या श्रुती असणारा तोच हवाय! मातीआड जाऊन तो आभाळ झाला पण राबून, स्वत:ला त्याच्या घरच्या मातीत गाडून, रुजून आलेली ती मात्र भुई सोडू शकत नाही हे दु:ख म्हणायचं की त्याचं नशीब? तिची आसवं रोज पिऊन हळुवार झालेली मातीच जाणू
शकते. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी लज्जागौरी या आपल्या पुस्तकात असा उल्लेख केला आहे की फार पूर्वी सर्व नवीन पेरण्यांची सुरुवात ही स्त्रियांच्या हातून केली जात असे. मातीचं अंतरंग आणि स्त्राrचं अंतरंग यात साम्य असतं. दोघीही सृजनवती असतात. म्हणून पहिला पाऊस पडल्यानंतर माती गंधवती होते. श्रावणात घन निळा बरसला या गीतात ‘मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा’ असा उल्लेख करून मातीचा गौरव केला आहे. तिच्या आंत हिरवेपण दडलेलं असतं. म्हणून तिच्या सहवासात निजलेल्या जिवाला ती आपल्यात सामावून घेते आणि रुजवूनही घेते. माटी के मोल काय करणार आपण? त्यापेक्षा मूठभर माती हातात घेऊन म्हणावं, मातीमाय तू माझी माय!
अॅड. अपर्णा परांजपे- प्रभु