कुर्डुवाडी प्रतिनिधी
चार दिवसापूर्वी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातून कॉन्स्टेबलला धक्का देऊन भिंतीवरून उडी मारुन पळालेल्या आरोपीला अखेर कुर्डुवाडी पोलिसांनी सोमवारी नेवासे येथून अटक केली. राहुल मरगळ (माळी) (रा. नेवासा ) असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
कुर्डू ता. माढा येथील तुकाराम पायगण यांचे टमटम, घरगुती, शेतीची अवजारे असे तीन लाख रुपयांचे साहित्य चोरी केल्या प्रकरणी राहुल मरगळ (माळी), दशरथ मरगळ (माळी), दत्ता मरगळ (माळी) (सर्व रा. नेवासा जि. अहमदनगर) या तिघाजणांवर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी या तिघांना कुर्डुवाडी पोलिसांनी नेवासे येथून पकडून आणले होते. दरम्यान दि.९ रोजी दुपारी दोन वाजता तिघांपैकी राहुल याने पोलिसांना लघुशंकेला जायचे कारण देत पोलिस कॉन्स्टेबल धनाजी माळी यांना धक्का मारून पोलिस ठाण्याच्या कठड्यावरुन धूम ठोकली होती. गेल्या चार दिवसापासून पोलिस याचा कसून शोध घेत असताना खबऱ्यांमार्फत सदर संशयीत आरोपीने नेवासे येथील मामाला फोन करुन येत असल्याचे कळवले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून व फोन लोकेशनवरुन सापळा रचला व सदर संशयित आरोपी राहूल मरगळ यास नेवासे येथून अटक करुन कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात सोमवार दि.१३ रोजी हजर केले.