पिराची कुरोली येथील घटना; बेपत्ता तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू
पंढरपूर प्रतिनिधी
दारूच्या नशेत पिराचीकुरोली (ता. पंढरपूर) येथील बंधाऱयावरून भीमा नदीत तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे. गजेंद्र ऊर्फ सज्जन संतोष गायकवाड (वय 21, रा. धोंडेवाडी, ता. पंढरपूर) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस व स्थानिकांच्या मदतीने युवकाचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील गजेंद्र ऊर्फ सज्जन संतोष गायकवाड हा त्याचा चुलता भारत रामचंद्र गायकवाड (रा. धोंडेवाडी) यांच्यासोबत करकंब येथे पाहुण्यांकडे गेला होता. पाहुण्यांकडून परत आल्यानंतर पटवर्धनकुरोली (ता. पंढरपूर) येथील पुलावरून गजेंद्र ऊर्फ सज्जन गायकवाडने भीमा नदीत उडी मारली. यावेळी चुलता भारत गायकवाड हे युवकासोबत होते. पंढरपूर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे स्थानिकांच्या मदतीने युवकाचा शोध घेत आहेत. सध्या नदीमध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने युवकाला शोधण्यास अडथळा येत आहे.