शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे : कर्मचाऱ्यांची कमतरता मोठी अडचण : आमदारांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी
खानापूर : खानापूर हेस्कॉमच्या कारभारामुळे अनेक गावात वीज समस्या निर्माण झालेली आहे. त्यात खानापूरच्या पश्चिम आणि दक्षिण भागात पावसाळ्यात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होतो. जांबोटी भागातील 40 गावांना तर पावसाळ्यात कायम अंधारातच रहावे लागते. तसेच तालुक्मयाच्या पश्चिम भागातही तीच परिस्थिती आहे. तर नेरसा, कोंगळा, पास्टोली, देगाव, मेंडील, जामगाव या भागातही वीजपुरवठा पावसाळ्यात कायमच खंडित राहतो. याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती अर्ज-मोर्चे काढून निवेदन देण्यात आली आहेत. मात्र हेस्कॉमच्या कारभारात काहीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे तालुक्मयातील ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत खानापूर तालुका हेस्कॉमच्या कार्यकारी अधिकारी कल्पना तिरवीर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, खानापूर तालुक्मयात एकूण 308 गावे असून या संपूर्ण गावात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होत आहेत. मात्र फक्त 46 लाईनमन आहेत. त्यातील पंधरा कर्मचारी कंत्राटी आहेत. एकूण 308 गावांना या 46 लाईनमनवर अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागात घनदाट जंगलातून वीजवाहिन्या गेल्यामुळे वाऱ्याने तसेच पावसाने एक जरी खांब पडला तर सलग पाच-सहा खांब पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व वीजपुरवठा खंडित होतो. कमी कर्मचाऱ्यांमुळे योग्य वेळेत वीजपुरवठा सुरळीत करता येत नाही. तसेच अलीकडे 22 कर्मचारी निवृत्त झाले. मात्र या ठिकाणी नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. तालुक्मयाची व्याप्ती व परिसर पाहता किमान 189 लाईनमन हवे आहेत. मात्र शासनाकडून याबाबत कोणतीच कारवाई होत नाही. आम्ही खानापूर तालुक्मयासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती हेस्कॉमच्या माध्यमातून सरकारला दिलेली आहे. शासनाकडून याची पूर्तता होणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी कर्मचारी खानापूरला येण्यास टाळत आहेत. त्यामुळे खानापूरला येण्याऐवजी कायमस्वरूपी कर्मचारी हे विजापूर, बागलकोट या भागात जात आहेत. याबाबत शासनाने तातडीने किमान 150 लाईनमन तरी उपलब्ध करून द्यावेत.
तालुक्मयात हलशी आणि बैलूर येथे उपवीज केंद्र मंजूर झाले आहेत. हलशी केंद्राचे काम सुरू असून बैलूरला जर 33 केव्ही वीज केंद्र सुरू झाल्यास 40 गावांची वीज समस्या कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. यासाठी बैलूर ग्रा.पं.ने तीन एकर जागा देण्याचे मान्य केले होते. मात्र एकरी 32 लाख ऊपये दर सांगितल्याने कंपनीकडून फक्त एक एकर जागेचा प्रस्ताव पाठविला आहे. शासनाने एक एकर जागेच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यास तातडीने उपवीज केंद्राचे काम सुरू होणार आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहेत. खानापूर हेस्कॉमच्या वीजकेंद्रासाठी आवश्यक जागेसंदर्भातील कागदपत्रांची माहिती आणि प्रपोजल शासनाकडे पाठविले आहे. शासनाने जागेच्या प्रस्तावास मान्यता दिल्यास ही जागा बैलूर ग्रा.पं.कडून खरेदी करून तातडीने बैलूर येथील वीज केंद्राचे काम सुरू होण्यास मदत होईल. मात्र शासनाकडून निर्णय होणे गरजेचे आहे, असे तिरवीर यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले. तालुक्मयातील वीज समस्या मिटवण्यासाठी शासकीय पातळीवर तसेच वीज मंत्रालयाकडे राजकीय दबावतंत्र वापरणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन यासाठी वीजखात्याकडे कर्मचारी नियुक्ती आणि बैलूर वीज केंद्रासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. अन्यथा खानापूर तालुक्मयातील वीज समस्या कायमच राहणार आहे.