8 दिवसांनी निवासस्थानी परतल्या ः 23 जूनला ईडीसमोर उपस्थित रहावे लागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयातून सोमवारी निवासस्थानी परतल्या आहेत. कोरोनामुळे 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. 75 वर्षीय सोनिया गांधी 2 जून रोजी कोरोना विषाणूमुळे संक्रमित आढळून आल्या होत्या.
सोनिया यांना श्वासनलिकेत फंगल इन्फेक्शन झाले होते. यामुळे गुरुवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. यासंबंधीची माहिती काँगेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली होती. सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. कोरोना संक्रमित असल्याने त्यांनी तपास यंत्रणेकडून मुदत मागितली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.