वायुदल प्रमुखांनी दिली माहिती : चीन सीमेवर भूहल्ला करण्यासाठी ठरणार प्रभावी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिग-29, मिराज 2000 आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यासारख्या प्लॅटफॉर्ममध्ये नेक्स्ट जनरेशन ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात करता येणार आहे. यामुळे चीन सीमेवर भूहल्ल्यांना अधिक प्रभावी करता येणार असल्याचे वायुदलप्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी बुधवारी म्हटले आहे.
नेक्स्ट जनरेशन ब्राह्मोस स्मॉल व्हर्जनचे असेल आणि त्यांना छोट्या लढाऊ विमानांमधूनही डागता येणार आहे. 3 वर्षांपूर्वी लडाखमध्ये चीनसोबत झालेल्या झटापटीनंतर आम्हाला याची आवश्यकता भासली होती. सुखोई एसयू-30 या लढाऊ विमानावर ब्राह्मोस जोडल्यावर वायुदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.
देशाचे ब्रह्मास्त्र आहे ब्राह्मोस
ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे देशाचे ब्रह्मास्त्र आहे. आत्मनिर्भरतेचा अर्थ प्रत्येक गोष्ट भारतात उत्पादित करावी असा नाही. आमच्या सारख्या विकसनशील देशासाठी हे शक्य देखील नाही. संयुक्त उपक्रम आम्ही स्थापन करत असून ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील. ब्राह्मोस एअरोस्पेस अशाच प्रकारचा एक संयुक्त उपक्रम असल्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे. देशात आता अनेक आमुलाग्र बदल घडून येत आहेत, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आमची प्रतिमा बळकट होतेय. जग आता आमच्याकडे अपेक्षेने पाहत असल्याचे उद्गार चौहान यांनी काढले आहेत.
तिन्ही दलांकडे सुपरसोनिक क्षेपणास्त्र
ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आता तिन्ही संरक्षण दलांना प्राप्त झाले आहे. पहिले सुपरसोनिक क्षेपणास्त्र भारतीय नौदलाला 2005, सैन्याला 2007 तर वायुदलाला 2020 मध्ये प्राप्त झाले आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारताकडे स्वत:चे हायपरसोनिक क्षेपणास्त्र देखील असेल.