पाचव्या वनडेत 122 धावांनी विजयी, सामनावीर जान्सेनची अष्टपैलू चमक, मार्करमचे अर्धशतक, केशव महाराजचे 4 बळी
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
मार्को जान्सेनची अष्टपैलू चमक, एडन मार्करम व डेव्हिड मिलर यांची शानदार अर्धशतके, फेहलुक्वायोची जोरदार फटकेबाजी व केशव महाराजची भेदक फिरकी यांच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 122 धावांनी दणदणीत विजय मिळवित संस्मरणीय मालिकाविजय मिळविला. 23 चेंडूत 47 धावा आणि 39 धावांत 5 बळी मिळविणाऱ्या मार्को जान्सेनला सामनावीराचा तर मार्करमला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
अतिशय चुरशीची झालेली ही पाच सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने 3-2 अशा फराकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर दक्षिण आफ्रिकेने जोरदार फटकेबाजी करीत निर्धारित 50 षटकांत 9 बाद 315 धावा जमवित ऑस्ट्रेलियासमोर मोठे आव्हान ठेवले. आधीच्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने चारशेहून अधिक धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर जान्सेनच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव 34.1 षटकांत 193 धावांत आटोपला.
कर्णधार टेम्बा बवुमा दुसऱ्याच षटकात शून्यावर धावचीत झाल्याने द.आफ्रिकेची खराब सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्या नंतरच्या फलंदाजांनी पहिल्या दहा षटकांत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर फारसे आक्रमणच केले नाही. 10 षटकांच्या पॉवरप्लेअखेर त्यांनी 1 बाद 32 धावा जमविल्या होत्या. नाथन एलिसने डीकॉकला स्लिपमध्ये 27 धावांवर झेलबाद केले. त्याने 39 चेंडूत 4 चौकार मारले. द.आफ्रिकेने 14 व्या षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. रास्सी व्हान डर ड्युसेन व मार्करम यांनी सावध खेळ करीत भक्कम भागीदारी रचण्याचे प्रयत्न केले. पण 19 व्या षटकात ड्युसेनला अॅबॉटने बाद करीत ही जोडी फोडली, त्यावेळी दोघांनी 43 धावांची भर घातली होती. 48 चेंडूंच्या खेळीत त्याने 2 चौकार, एक षटकार मारला. यावेळी द.आफ्रिकेने 3 बाद 80 धावा जमविल्या होत्या. त्यावेळी ते तीनशेची मजल मारतील असे वाटले नव्हते. 23 व्या षटकात त्यांचे शतक फलकावर लागले.
आधीच्या सामन्यात हेन्रिच क्लासेनने अॅडम झाम्पावर जोरदार हल्ला केला होता. पण यावेळी झाम्पाने त्याला तशी संधी न देता केवळ 6 धावांवर त्याला बाद केल्यावर त्यांची स्थिती 4 बाद 103 अशी झाली. दरम्यान, मार्करमने 54 चेंडूत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. त्याचा 5 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. मार्करम व मिलर यांची चांगली जोडी जमली आणि दोघांनी आक्रमक फटकेबाजी करीत पाचव्या गड्यासाठी 102 चेंडूत 109 धावांची शतकी भागीदारी नोंदवली. टिम डेव्हिडने मार्करमला बाद करून ही जोडी अलग करताना त्याचे शतकही हुकवले. मार्करमने 87 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 93 धावा फटकावल्या. 32 व्या षटकात त्यांचे दीडशतक व 40 व्या षटकात द्विशतक फलकावर लागले. मिलरनेही सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक 59 चेंडूत पूर्ण केले. त्यात 3 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. मार्करम झाला तेव्हा द.आफ्रिकेने 41.1 षटकांत 5 बाद 212 धावा जमविल्या होत्या.
मिलरला जान्सेनकडून चांगली साथ मिळाल्याने दोघांनी सहाव्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर फेहलुक्वायोनही जबरदस्त फटकेबाजी करीत केवळ 19 चेंडूत नाबाद 38 धावा झोडपल्यामुळे द.आफ्रिकेला 50 षटकांत 9 बाद 315 धावांची मजल मारता आली. फेहालुक्वायोने आपल्या खेळीत 2 चौकार, 4 षटकार ठोकले तर मिलरने 65 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 63 धावा काढल्या आणि जान्सेनने केवळ 23 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाच्या झाम्पाने 3, अॅबॉटने 2, ग्रीन, एलिस, डेव्हिड यांनी एकेक बळी टिपला.
आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 34 धावांची बऱ्यापैकी सुरुवात केली. पण पहिला गडी बाद झाल्यानंतर त्यांच्या डावाला गळती लागली. 2 बाद 34 अशा स्थितीनंतर कर्णधार व सलामीवीर मार्श व लाबुशेन यांनी 90 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटल्यानंतर जान्सेन व केशव महाराज यांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले आणि त्यांचा डाव 193 धावांत गुंडाळून द.आफ्रिकेने 15 पेक्षा जास्त षटके बाकी ठेवत विजय साकार केला. मार्शने 56 चेंडूत 6 चौकार, 6 षटकारांसह 71, लाबुशेनने 63 चेंडूत 44, अॅबॉटने 26 चेंडूत 23 ग्रीनने 18 धावा जमविल्या. जान्सेनने 5 तर केशव महाराजने 33 धावांत 4, फेहलुक्वायोने 1 बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 9 बाद 315 : डी कॉक 27, ड्युसेन 30, मार्करम 87 चेंडूत 93, मिलर 65 चेंडूत 63, जान्सेन 23 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 47, फेहलुक्वायो 19 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 38, अवांतर 11. गोलंदाजी : झाम्पा 3-70, अॅबॉट 2-54, एलिस 1-49, ग्रीन 1-59, डेव्हिड 1-20.
ऑस्ट्रेलिया 34.1 षटकांत सर्व बाद 193 : मार्श 56 चेंडूत 6 चौकार, 6 षटकारांसह 71, वॉर्नर 10, लाबुशेन 63 चेंडूत 44, ग्रीन 18, अॅबॉट 23, अवांतर 10. गोलंदाजी : मार्को जान्सेन 5-39, केशव महाराज 4-33, फेहलुक्वायो 1-44.