ताशी 120 कि. मी. गतीने धावले इंजीन
बेळगाव : मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण व दुपदरीकरण सुरू आहे. यातीलच एक भाग असणारा बेळगाव-सुलधाळ रेल्वेमार्गाची मंगळवारी ताशी 120 कि. मी. गतीने इलेक्ट्रिक इंजीनच्या साहाय्याने वेगचाचणी घेण्यात आली. भविष्यात या मार्गावरून वेगाने धावणाऱ्या एक्स्प्रेस धावू शकणार आहेत. इंधन खर्च कमी होऊन रेल्वेची गती वाढावी, या उद्देशाने दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. लोंढा ते मिरज या भागातील विद्युतीकरण व दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातील एक भाग असणाऱ्या बेळगाव-सुलधाळ या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण काही दिवसांपूर्वीच झाले. त्यामुळे या मार्गावर वेगचाचणी घेऊन नवीन मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याची चाचपणी करण्यात आली.