नवीन बाजारपेठेचा शोध घेण्यास भारतला यश मिळणार असल्याचा मंत्री गोयल यांचा दावा
नवी दिल्ली :
मसाला उद्योगाने नवीन बाजारपेठा शोधण्यासाठी, विद्यमान बाजारपेठांना बळकट करण्यासाठी आणि 2030 पर्यंत 10 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. ‘वर्ल्ड स्पाईस काँग्रेस 2023‘ ला संबोधित करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
सध्या आमची एकूण मसाल्यांची निर्यात चार अब्ज डॉलर्सची आहे. कच्च्या स्वरूपात मसाले निर्यात करण्याऐवजी आपण मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन आणि बळकट करून अधिक बाजारपेठा निर्माण केल्या पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
कोविड महामारीच्या काळात हळदीच्या वापरात झालेल्या वाढीचा संदर्भ देताना ते म्हणाले, जर आपण मूल्यवर्धित उत्पादने विकसित करून आपली सर्व शक्ती हळदीवर केंद्रित केली तर केवळ हळदीची निर्यात दोन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे.उच्च दर्जाच्या आणि प्रीमियम मसाल्याच्या उत्पादनांचे प्रतिनिधित्व करणारा ब्रँड म्हणून प्रमाणपत्र म्हणून ‘भारत’ हे नाव ठेवावे, असेही मंत्र्यांनी सुचवले.
परदेशात 3.5 कोटीहून अधिकजण राहणारे भारतीय वंशाचे
यासोबतच गोयल म्हणाले की, परदेशात राहणारे 3.5 कोटीहून अधिक भारतीय वंशाचे लोक मसाल्याच्या व्यवसायात खूप मोलाची भर घालू शकतात.
ते म्हणाले, ‘परदेशात राहणारे भारतीय प्रवासी इतर समुदायांमध्ये मसाल्याचा वापर वाढवण्यास मदत करू शकतात. ते तुमचे ब्रँड अॅम्बेसेडर बनू शकतात आणि उद्योगाला त्याची बाजारपेठ आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविण्यात मदत करू शकतात.’