‘बाप से बेटा सवाई’…स्टुअर्ट ब्रॉड!
इंग्लंडच्या ख्रिस ब्रॉड यांनी मैदान गाजविलं होतं ते फलंदाजीत. त्यांची परंपरा गोलंदाजीत पुढं नेताना मुलगा स्टुअर्ट ब्रॉड नुसता संघाचं प्रमुख शस्त्रच बनलेला नाही, तर तो आता इतिहासातील महान गोलंदाजांच्या खांद्याला खांदा भिडवून उभा राहिलाय…ब्रॉडच्या कारकिर्दीकडे पाहता ‘बाप से बेटा सवाई’ असंच म्हणावं लागेल…
19 सप्टेंबर, 2007…दक्षिण आफ्रिकेतील त्या पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा इंग्लंडविरुद्धचा सामना आठवतोय ?…डावाच्या 19 व्या षटकात तडाखेबंद फलंदाज युवराज सिंगनं षटकारांची बरसात सुरू करताना सहाही चेंडू मैदानाबाहेर भिरकावून देण्याचा भीमपराक्रम केला अन् 12 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण करून टाकलं…षटक संपलं तेव्हा 21 वर्षांच्या, पोरसवदा दिसणाऱ्या गोलंदाजाचा चेहरा रडवेला झाल्याप्रमाणं बनला होता…त्या घटनेला आता 16 वर्षं झालीत…अशा जबरदस्त हल्ल्याला सामोरं जावं लागल्यानंतर कुणीही पार खचून गेला असता. परंतु स्टुअर्ट ब्रॉड त्यातून नुसता सावरला नाही, तर पुढं इंग्लिश माऱ्याच्या मुख्य हत्यारांपैकी एक बनला…आणि आता तर चक्क कसोटींत 600 हून अधिक बळी घेतलेल्या क्रिकेटच्या इतिहासातील निवडक महान गोलंदाजांच्या रांगेत जाऊन बसण्याची कामगिरी त्यानं केलीय…
ब्रॉडनं ‘अॅशेस’ मालिकेच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 600 बळींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला तो ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला ज्यो रुटकडे झेल देण्यास भाग पाडून…पण इंग्लंडचे माजी फलंदाज अन् हल्लीच्या काळात सामनाधिकारी म्हणून जास्त गाजलेले ख्रिस ब्रॉड यांचा मुलगा असलेल्या स्टुअर्टची सुरुवात मुळात गोलंदाजीपासून झालीच नव्हती. इतकंच नव्हे, तर एक वेळ क्रिकेट हे त्याचं एकमेव ध्येयही नव्हतं. व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्यापूर्वी तो हॉकीमध्ये गोलरक्षकाची भूमिका बजवायचा अन् इंग्लंडच्या राष्ट्रीय हॉकी संघासाठीच्या चाचण्यांतही त्याचा सहभाग राहिला होता. पण पुढं त्यानं सर्व लक्ष केंद्रीत केलं ते क्रिकेटवर…
स्टुअर्ट ब्रॉडनं शालेय स्तरावर सुऊवात केली होती ती वडिलांप्रमाणंच फलंदाज म्हणून अन् तुलनेनं उशिरा तो गोलंदाजीकडे वळला. वयाचं 17 वं वर्ष येईपर्यंत उंची ताडासारखी वाढत गेल्यानंतर त्याचा फायदा घेऊन त्यानं वेगवान गोलंदाजी टाकण्यावर भर देण्यास प्रारंभ केला…18 वर्षं पूर्ण होण्यापूर्वी ब्रॉड व्यावसायिक स्तरावर खेळला तो लिस्टरशायरच्या द्वितीय संघातर्फे. त्याच्या कामगिरीनं प्रभावित होऊन क्लबच्या संचालकांनी लगेच त्याच्यासाठी मुख्य संघाची द्वारं खुली केली (आता तो नॉटिंगहॅमशायरकडून खेळतोय)…
6 फूट 6 इंच उंचीच्या स्टुअर्ट ब्रॉडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2006 साली पाकिस्तानविऊद्धच्या टी-20 सामन्यातून पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यानं एकदिवसीय संघात पदार्पण केलं ते त्याचवेळी…त्याच्या पुढच्या वर्षी मायकेल वॉनच्या नेतृत्वाखालील संघातून श्रीलंकेविऊद्ध कोलंबो इथं तो आपली पहिली कसोटी खेळला…त्यानंतर ब्रॉड त्याच्या ‘मॅच-विनिंग स्पेल्स’मुळं वेळोवेळी प्रकाशझोतात राहिलाय. लगेच भडका उडणाऱ्या स्वभावाबरोबर हार न मानणारा लढाऊ आक्रमक गोलंदाज आाr ब्रॉडची प्रतिमा राहिलीय. चेंडू उसळविण्याखेरीज उशिरा ‘स्विंग’ करण्याची त्याची क्षमता जगातील अनेक आघाडीच्या फलंदाजांना भारी पडलीय…
स्टुअर्ट ब्रॉडच्या कारकिर्दीतील सर्वांत प्रसिद्ध क्षण म्हणजे इंग्लडच्या 2015 च्या ‘अॅशेस’मधील विजयात ट्रेंट ब्रिजवरील घरच्या मैदानावर त्यानं ऑस्ट्रेलियाची अक्षरश: एक हाती कापून काढलेली फळी. त्यावेळी दुखापतीमुळं अँडरसन खेळत नव्हता. पण त्याची उणीव जाणवू न देता पहिल्या सत्रात त्यानं अवघ्या 15 धावांत 8 फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखविली. त्यामुळं कांगारुंचा डाव उपाहारापूर्वीच केवळ 18.3 षटकांत 60 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाची अशी मानहानी क्वचितच झालीय (2011 मध्ये याच मैदानावर त्यानं भारताविऊद्ध केवळ 5.1 षटकांत 5 धावा देऊन हॅट्ट्रिकसह 5 बळी घेतले)…त्याच्या सहा वर्षं आधी 2009 साली ब्रॉडनं ऑस्ट्रेलियाला असाच तडाखा दिला होता तो निर्णायक पाचव्या कसोटीत. त्यानं 5 बळी घेताना अवघ्या 21 चेंडूंत 8 धावा देऊन चार जणांना गारद केलं. या जबर धक्क्यातून इंग्लंडचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पुढं बाहेरच येऊ शकला नाही…
स्टुअर्ट ब्रॉड केवळ गोलंदाजीमुळंच चर्चेत राहिलाय असं नव्हे…अनेकदा त्याचं फलंदाजीतील कौशल्य देखील इंग्लंडच्या मदतीस धावून गेलंय…2010 साली लॉर्ड्सवर पाकिस्तानविऊद्ध त्यानं शानदार 169 धावांची खेळी करून दाखविली होती. त्यावेळी पाकच्या भेदक गोलंदाजीविऊद्ध 7 बाद 102 अशी त्यांची परिस्थिती झाली होती. मात्र ट्रॉटसह त्यानं केलेल्या 332 धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीनं त्यांना सावरलंच नाही, तर इंग्लंडला मालिकाही जिंकून दिली…पण त्यानंतर चार वर्षांनी भारताच्या वऊण अॅरॉनच्या एका बाउन्सरनं ब्रॉडचं नाक मोडलं अन् त्याची फलंदाजी अक्षरश: जमीनदोस्त झाली…
स्टुअर्ट ब्रॉडकडे टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. पण ही कारकीर्द फार काळ टिकली नाही अन् त्याच्या अधिपत्याखालील इंग्लंडला टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरीही करून दाखविता आली नाही. त्यानं 2011 ते 15 दरम्यान 27 लढतींत नेतृत्व सांभाळलं…त्यानंतर एक महत्त्वाचा खेळाडू टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कसोटीसाठीच ब्रॉडचा अधिकाधिक वापर केला गेला…कधी दुखापतीमुळं, तर कधी फॉर्म गमावल्यामुळं स्टुअर्ट ब्रॉडला संघातील स्थान गमवावं लागलेलं असलं, तरी त्यानं लगेच पुनरागमन करण्यातही यश मिळविलंय. मध्यंतरी वाढत्या वयानुसार त्याचा वेग घटत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. पण त्यानं वेळोवेळी आपला प्रभाव नि उपयुक्तता कायम असल्याचं दाखवून दिलंय. सध्याच्या ‘अॅशेस’ मालिकेत बळी घेण्याच्या बाबतीत आघाडीवर राहून त्यानं ते पुन्हा एकदा सिद्ध केलंय!
महान गोलंदाजांच्या रांगेत स्थान…
- या 37 वर्षीय वेगवान गोलंदाजानं मिळविलेल्या 600 बळींपैकी 394 बळी नोंदले गेलेत ते इंग्लंडमध्ये., तर 206 विदेशी भूमीवर…त्यात 175 एकदिवसीय नि 65 टी-20 बळी मिळविल्यास एकंदरित 842 बळींसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींच्या यादीत सातव्या स्थानावर विराजमान झालाय…
- 600 कसोटी बळींचा उल्लेखनीय टप्पा पार केलेल्या महान गोलंदाजांच्या गटात समावेश आहे तो श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800 बळी), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (708), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (688) अन् भारताचा अनिल कुंबळे (619) यांचा. ब्रॉड नि अँडरसन हेच तेवढे या गटातील वेगवान गोलंदाज…
- ब्रॉडनं ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या कसोटींतील बळींची संख्या 150 वर नेत या यादीत बराच काळ अग्रस्थानी राहिलेला इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू इयान बॉथमला (148 बळी) मागं टाकलंय…
- स्टुअर्ट ब्रॉडचे जेम्स अँडरसनसमवेत सुरेख सूर जुळलेत. ही कसोटी क्रिकेटमध्ये 1000 बळी मिळविणारी दुसरी जोडी. त्यापूर्वी हा मान होता फक्त ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा नि शेन वॉर्न यांच्या नावावर. ब्रॉड व अँडरसन यांनी मागील 16 वर्षांत एकत्र खेळलेल्या 133 कसोटी सामन्यांमध्ये हा टप्पा पार करून त्यांना मागं टाकलं. वॉर्न अन् मॅकग्रा यांनी एकत्र खेळलेल्या 104 कसोटींमध्ये 1001 बळी मिळविले होते…
भेदक गोलंदाजी…
- स्टुअर्ट ब्रॉडनं 20 वेळा पाच बळी आणि तीन वेळा सामन्यांत 10 बळी घेतलेत. त्यापैकी 2013 साली चेस्टर-ले-स्ट्रीट इथं ऑस्ट्रेलियाविऊद्ध 121 धावा देऊन घेतलेले 11 बळी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी…
- ब्रॉड हा इंग्लंडचा असा एकमेव गोलंदाज ज्याच्या नावावर दोन कसोटी ‘हॅट्ट्रिक’ आहेत. पहिली ‘हॅट्ट्रिक’ त्यानं 2011 मध्ये भारताविऊद्ध करताना धोनी, हरभजन, प्रवीण कुमार यांना बाद केले तर दुसऱ्याची नोंद केली ती 2014 साली श्रीलंकेविऊद्ध…
- ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा त्याचा आवडता ‘बळीचा बकरा’. 2013 पासूनच्या सात अॅशेस मालिकांत त्यानं 17 वेळा त्याला बाद केलंय. 2019 साली 10 डावांमध्ये सात वेळा त्यानं वॉर्नरला परतीची वाट दाखविली होती…
- 2013 ते 2016 हा ब्रॉडचा सुवर्णकाळ म्हणायला हवा. या चार वर्षांत त्यानं 25.56 च्या सरासरीनं 196 बळी खात्यात जमा केले…2021 साली मात्र त्याचा फॉर्म अगदीच खराब राहून त्याला सात कसोटींत केवळ 12 बळी घेता आले…स्टुअर्ट ब्रॉडची दरवर्षी बळींची सरासरी 40 इतकी राहिलेली असून यंदाही त्याच दिशेनं त्याची वाटचाल नेटानं चाललीय…
गोलंदाजीतील कारकीर्द…
प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी 5 बळी 10 बळी
कसोटी 166 307 600 15 धावांत 8 बळी 121 धावांत 11 बळी 27.68 20 3
वनडे 121 121 178 – 23 धावांत 5 बळी 30.13 1 –
टी20 56 55 65 – 24 धावांत 4 बळी 22.94 – –
फलंदाजीतील कामगिरी…
प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं
कसोटी 166 242 39 3647 169 17.97 1 13
वनडे 121 68 25 529 45 12.3 – –
टी20 56 26 10 118 18 7.38 – –
– राजू प्रभू
खेळ जुनाच, ओळख नवी ! खुल्या पाण्यातील जलतरण
खुल्यावर पाण्यात पोहणे ज्याला ‘मॅरेथॉन जलतरण’ देखील म्हणतात, ते तलाव, नदी वा समुद्र-महासागर यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये आयोजित केले जाते. बहुतेक खुल्या पाण्यातील पोहण्याच्या शर्यती दीर्घ पल्ल्याच्या असतात आणि उच्च पातळीच्या ‘स्टॅमिना’ची त्यासाठी आवश्यकता असते. सध्या जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये या प्रकाराचे आयोजन केले जाते…
- खुल्या पाण्यातील जलतरण हा अनेक दशकांपासून मान्यताप्राप्त क्रीडाप्रकार राहिला आहे आणि तो ऑलिम्पिक खेळांचाही भाग आहे. अशा शर्यती विविध अंतरांत आयोजित केल्या जातात. सदर अंतर शर्यत आयोजित करणाऱ्या प्रशासकीय संस्थेकडून ठरविले जाते. ऑलिम्पिकमध्ये ही शर्यत 10 किलोमीटर अंतराची असते आणि ती पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत होते. ‘फिना’तर्फे जागतिक स्पर्धेत 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 25 किलोमीटर अंतरांच्या शर्यती आयोजित केल्या जातात…
- ऑलिम्पिकमध्ये यात कोणतीही प्राथमिक शर्यत आयोजित केली जात नाही, फक्त एकच शर्यत घेतली जाते आणि ती फ्रीस्टाइल शैलीत होते. असे असले, तरी ‘फीडिंग स्टेशन’पासून जलतरणपटू उचित शैलीत पोहू शकतो…
- जलतरण प्रशिक्षक संबंधित जलतरणपटूंना चार पेयपान केंद्रांवर पेय आणि सल्ला देऊ शकतात. तथापि, यावेळी प्रशिक्षक पाण्यात पडला, तर संबंधित खेळाडू त्वरित अपात्र ठरतो…
- शर्यतीचे स्वरूप अगदी सरळ असते. जलतरणपटू सुऊवातीच्या बिंदूपासून एकत्र सुरुवात करतात आणि जो शेवटी प्रथम पोहोचतो त्याला विजेता घोषित केले जाते. या खेळाला ‘मॅरेथॉन जलतरण’ म्हणून संबोधले जाते कारण 10 किलोमीटरांची शर्यत पूर्ण करण्यासाठी साधारणत: दोन तास लागतात. धावण्याची ‘मॅरेथॉन’ पूर्ण करण्यासाठी धावपटूंना इतकाच वेळ लागत असतो…
- ‘गॉगल’, ‘स्विम कॅप्स’ आणि ‘स्विमसूट’ यांसारख्या सामान्य जलतरण उपकरणांच्या व्यतिरिक्त ‘ओपन वॉटर स्विमिंग’चा एक प्रमुख पैलू म्हणजे ‘वेटसूट’चा वापर. त्याचा वापर आयोजक संस्थेवर अवलंबून असतो. काही शर्यतींमध्ये ‘वेटसूट’ वापरण्याची परवानगी दिली जाते, तर काही जण ‘वेटसूट’सह जलतरणाला वेगळा विभाग मानतात…
- 2012 सालच्या ऑलिम्पिकमधील पुऊषांच्या खुल्या पाण्यातील शर्यतीचा किताब ट्युनिशियाच्या ओसामा मेलौलीने मिळविला. त्यासरशी तो जलतरण तलाव आणि ‘ओपन वॉटर’ अशा दोन्ही प्रकारांत ऑलिम्पिक विजेतेपद पटकावणारा पहिला जलतरणपटू बनला. त्याने 2008 मध्ये 1500 मीटर्सची शर्यत जिंकली होती…
- 2016 च्या पुऊषांच्या खुल्या पाण्यातील शर्यतीत आतापर्यंतचा सर्वात रोमांचक शेवट पाहायला मिळाला. सुमारे दोन तास पाण्यात राहिल्यानंतर डच जलतरणपटू फेरी वेर्टमनने ‘फोटो फिनिश’मध्ये ग्रीक जलतरणपटू स्पायरीडॉन जियानिओटिसचा पराभव केला. जियानिओटिसने मिळविलेले पदक हे ग्रीससाठी जलतरणातील पहिले पदक होते. यावेळी कांस्यपदकाचा निकाल देखील ‘फोटो फिनिश’वरून लागला…
बॅडमिंटनमधील कोल्हापूरी आशास्थान : प्रेरणा आळवेकर
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी : देशातील प्रतिष्ठेच्या सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन टुर्नार्मेंटमध्येही केले प्रतिनिधीत्व
बॅडमिंटन खेळातील स्पर्धेत प्रतिनिधीत्व करायचे असेल तर खेळाडूकडे शारीरिक, मानसिक क्षमता टासून भरलेली असावी लागते. जो खेळाडू शटल वेगाने माऊ शकतो, प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेले शटल चपळतेने परतवून लावतो आणि हात व डोळ्यांचा योग्य समन्वय राखत सामना जिंकतो, तोच मैदान गाजवू शकतो हे उघड आहे. हा गुण कोल्हापूरची 21 वर्षीय प्रेरणा शिवाजी आळवेकर (वडणगे, ता. करवीर) हिच्यात प्रकर्षाने दिसतो. तीने गेल्या अकरा वर्षात शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तीन सुवर्ण पदक मिळवून देशात शालेयस्तरावर आव्हान निर्माण केले. शिवाय दोनदा शालेय पातळीवर झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तीने भारतीय संघातून प्रतिनिधीत्व केले. देशातील प्रतिष्ठेची व अगदी टॉपर खेळाडूंचा सहभाग असलेल्या सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन टुर्नार्मेंटमध्येही तीने महाराष्ट्र संघातून खेळण्याची संधी मिळवली. शिवाय तिच्या ऊपाने तब्बल 42 वर्षानंतर नॅशनल टुर्नार्मेंटमध्ये कोल्हापूरची महिला खेळाडू खेळू शकली.
सामान्य कुटुंबात वाढत असलेल्या प्रेरणाच्या बॅडमिंटन खेळातील कामगिरीमागे तिची आई राजश्री व वडील शिवाजी आळवेकर यांचे प्रोत्साहन राहिले आहे. आई-वडीलांनी तिच्या बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण केली. शिवाय बॅडमिंटनच तुझे भविष्यातील करीअर असे शब्दही सातत्याने तिच्या मनावर बिंबवले. हे शब्द ऐकत असतानाच प्रेरणा केवळ 9 वर्षाची होती. वडणगेतील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यामंदिर (वडणगे) शिकत होती. यावेळी तिला करीअर म्हणजे काय असते हे अजिबात माहिती नव्हते. मात्र बॅडमिंटन कसे खेळतात हे तिला टीव्हीवरील सामने पाहनू माहिती होते. वडील शिवाजी आवळेकर यांनी आपली मोठी मुलगी ऋचासोबत प्रेरणालाही बॅडमिंटनच्या सरावासाठी देवल क्लबजवळील राजारामीयन क्लबमध्ये दाखल केले. तेथील प्रशिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणाने सरावाला सुऊवात केली. जसे दिवस पुढे सरकू लागले तसे प्रेरणामध्ये बॅडमिंटन खेळासाठी आवश्यक असलेली शारीरिक, मानसिक क्षमता दिसून येऊ लागली. छोट्या हाताला अंगातील ताकद लावून शटल वेगाने मारणे, प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेले शटल परतवून लावणे यासाठीची तिच्यातील गुणवत्ताही उजेडात येऊ लागली. प्रशिक्षक जाधव यांनी तिच्यातील स्कीलपासून प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेल्या शटलवर नजर कशी ठेवायची हे प्रात्याक्षिकांसह प्रशिक्षण दिले. क्लबमध्ये असलेल्या मुलींमध्ये सामने खेळवले. या सामन्यात प्रेरणा ही 3 पैकी 2 सेट सहज मिळवून विजय संपादन करत होती. सहा वर्षांच्या सराव व सराव सामन्यांमधील उत्तम कामगिरी पाहून प्रेरणा आता स्पर्धा खेळू शकते हे प्रशिक्षकांसह आईवडीलांच्या लक्षात आले. यावेळी प्रेरणा ही वडणगेतील देवी पार्वती हायस्कूलमध्ये शिकत होती. पूर्ण तयारीनिशी तीने 2013-14 साली शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला. टप्प्या-टप्प्याने झालेल्या जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेवर वर्चस्व गाजत तीने प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वत:ला पात्र ठरवले. औरंगाबादेत झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेतही तीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत विजेतेपद मिळवले. वयाच्या 14 व्या वर्षीच जिल्हापासून राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच मिळालेल्या अफलातून यशाने प्रेरणाला मैदान गाजवण्यासाठी लागणारे बुस्टच मिळाले. रत्नागिरीत झालेल्या राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेवरही तीने राज्यातील मुलींवर हुकूमत गाजवत सुवर्ण पदक व रोख रकमेचे बक्षीस पटकावले.
दहावी पास झाल्यानंतर प्रेरणाने महावीर कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजचे शिक्षण घेतानाच 2016 सालीही तीने 17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धा जिंकत कडाप्पा (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारली. शिवाय या स्पर्धेही तीने सुवर्ण जिंकली. त्यामुळे प्रेरणा ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावाऊपाला आली. 2017-18 साली प्रेरणाला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. तीने विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय 19 वर्षाखालील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. या कागमिरीमुळे तिची आग्रा येथे आयोजित केलेल्या भारतीय संघ निवड चाचणीसाठी निवड केली. चाचणीतून निवडला जाणारा संघ हा वर्ल्ड स्कूल गेम्सअंतर्गत होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेत दाखल केला जाणार होता. 2018 साली नागपुरात झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्येही प्रेरणाने भारतीय संघातून प्रतिनिधीत्व कऊन दोन ते तीन सामने जिंकले होते. प्रेरणाने प्रशिक्षकांनी करवून घेतलेला सराव पणाला लावून चाचणीत चुणूक दाखवली. ही चुणूक पाहून प्रभावित झालेल्या निवड समितीने तिला भातीय संघात स्थान दिले. बालेवाडीत येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल गेम्समधील बॅडमिंटन स्पर्धेत प्रेरणाने एकेरी व दुहेरी प्रकारातील प्रत्येकी 2 सामने जिंकले. दुहेरी प्रकारात तर प्रेरणा व तामिळनाडूच्या शिवप्रीया यांच्या जोडीने उपांत्य फेरीतपर्यंत मजल होती.
प्रेरणा व कोल्हापूरसाठी 2023 हे साल महत्वाचे अतिशय महत्वाचे देशात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन टर्नार्मेंटमध्ये तब्बल 42 वर्षे कोल्हापूरच्या महिला बॅडमिंटनपटूंना सहभागी होण्याची संधी मिळालेली नव्हती. ही कमतरता प्रेरणाने दर्जेदार खेळाच्या जोरावर भऊन काढली. तीने गेल्या दीड वर्षभरात नागपूर, नांदेड व बुलढाणा येथे झालेल्या सिनिअर स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये नामवंत खेळाडूंना पराभूत उपांत्य फेरीपर्यंत मजल तर मारलीच शिवाय 4 गुणही आपल्या नावावर केले. या कामगिरीची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने दखल घेऊन तिची सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन टर्नार्मेंटसाठी महाराष्ट्र संघात निवड केली. ही टुनार्मेंट फेब्रुवारी महिन्यात बालेवाडीमध्ये (पुणे) बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही टुर्नार्मेंटमध्ये भारताच्या प्रत्येक राज्यांमधील केवळ टॉप-थ्री महिला बॅडमिंटनपटूच खेळणार होत्या. 42 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या राष्ट्रीय बॅडमिंटनपटू वर्षादेवी नाडगौंडे यांनी सिनिअर नॅशनल टुर्नार्मेंटमध्ये महाराष्ट्र संघातून प्रतिनिधी केले होते. त्यांच्याकडूनही मिळालेल्या टिप्सनुसार प्रेरणाने टुर्नार्मेंटमध्ये प्रतिनिधीत्व करताना फारशी मजल मारता आली नाही. मात्र नॅशनल टुर्नार्मेंटमध्ये आपल्यासह कोल्हापूरचे नाव झळकवण्याचा केलेला पराक्रम कोणालाच विसरता येणार नाही.
चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह वडीलांची प्रेरणाला खंबीर साथ…प्रशिक्षक तन्मय करमरकर
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या विविध वयोगटातील बॅडमिंटन स्पर्धांपैकी सात स्पर्धा जिंकण्याची किमया प्रेरणा आळवेकरने कऊन दाखवली आहे. गेल्या सहा वर्षापासून तन्मय करमरकर बॅडमिंटन अॅकॅडमीत ती आधुनिक सराव करत आहे. सरावात ती आळस करत नाही. रोज न चुकता चार तास सराव करत असल्याने तिच्यात सामन्यामध्ये जास्तीत गुणांच्या फरकांनी सेट जिंकण्याची ताकद निर्माण झाली आहे. जमेची बाजू म्हणजे 2014 पासून अगदी न चुकता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून तिला आर्थिक मदत मिळत आहे. या मदतीमुळेच तिला देशात ठिकठिकाणी जाऊन स्पर्धा खेळणे सहज शक्य झाले आहे. वडील शिवाजी आळवेकर हे शिक्षकी पेशा सांभाळत प्रेरणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे ती राष्ट्रीय बॅडमिंटनपटू म्हणून नावाऊपाला आली आहे.
संग्राम काटकर, कोल्हापूर