मडगाव : राज्य शासनाने गोवा क्रीडा प्राधिकरणाशी सलंग्नीत आपल्या सर्व क्रीडा संघटनांना राष्ट्रीय क्रीडा संहिता 2011 ची अनिवार्यपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. या क्रीडा संहितेत पदाधिकाऱ्यांसाठी वय तसेच कार्यकाळ निर्बंध आहेत. क्रीडा संघटनांना आपली विस्कटेलेली घडी व्यवस्थित बसविण्यासाठी आता क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत शेवटची मुदत दिली असून अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या आमसभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा सचिव अजित रॉय, सागच्या कार्यकारी संचालिका गीता नागवेकर तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मागील आमसभेच्या इतिवृतांला मान्यता मिळविण्यात आली. या आमसभेत तीन नवीन क्रीडा संघटनांना व तीन नवीन खेळांना मान्यता मिळविण्यात आली. सागचे नवीन खजिनदार म्हणून प्रज्योत चोडणकर यांच्या नियुक्तीला आमसभेने मान्यता दिली.
काल गोवा क्रीडा प्राधिकरणाची सर्वसाधारण सभा पणजीत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पत्रकारांशी क्रीडामंत्र्यानी संवाद साधला. ‘प्रत्येक क्रीडा संघटनेने क्रीडा संहितेचा अवलंब केला पाहिजे. आता राज्य क्रीडा संघटनांच्या निवडणुका सुद्धा क्रीडा संहितेनुसार होणार आहेत’ असे गोविंद गावडे म्हणाले. ज्या क्रीडा संघटनांनी आधीच्या त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुका घेतल्या आहेत आणि संहितेचे उल्लंघन केले आहे त्यांनी दुरूस्त्या केल्या पहिजेत आणि जानेवारी 2024 पर्यंत त्यांनी सर्व नियमांचे पालन केले आहे याची खात्री करावी, असे क्रीडामंत्री गावडे यावेळी म्हणाले. शासनाने दुरूस्तीसाठी आधीची मुदत दिली असती, परंतू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येत्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणार असल्याने वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रतिक्षा आम्ही करू, असे गावडे म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही एक मोठी स्पर्धा आहे व तिचे आयोजन निर्विघ्नपणे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जे क्रीडा संस्थांचे अधिकारी क्रीडा संहितेची पूर्तता करता नाहीत त्यांनी पदांचा त्याग करावा, असे यावेळी गावडे म्हणाले. यावेळी आमसभेला उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाला सहमती दर्शवली.