तिसऱ्यांदा चॅम्पियनशीप मिळविण्याचे उद्दिष्ट
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सदर्न कमांड विभागातील कॅन्टोन्मेंट शाळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले आहे. दि. 27 आणि 28 असे दोन दिवस या स्पर्धा होणार असून यामध्ये भाग घेण्यासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट शाळेचे 140 विद्यार्थी मंगळवारी रेल्वेने चेन्नईकडे रवाना झाले. तिसऱ्यांदा चॅम्पियनशीप मिळविण्याचे उद्दिष्ट शाळेने ठेवले आहे.
कॅन्टोन्मेंटच्या शाळांची क्रीडा स्पर्धा विभागवार आयोजित केली जाते. सदर्न कमांड विभागाच्यावतीने या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा सेंट थॉमस माऊंट व पलीवरम् कॅन्टोन्मेंट येथे आयोजित करण्यात आले आहे. कब्बडी, व्हॉलीबॉल, खो खो, अॅथलेटिक्स, उंच उडी, लांब उडी अशा विविध स्पर्धा मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी दोन वेळा चॅम्पियनशीप मिळविली आहे. यावेळी देखील चॅम्पियनशीप मिळविण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर सराव केला आहे. 27 आणि 28 रोजी होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक असे एकूण 140 जण मंगवारी चेन्नईकडे रवाना झाले आहेत.
क्रीडा स्पर्धा शिक्षकांची की, विद्यार्थ्यांची?
क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी चेन्नईला जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर दाखल होते. याचे वृत्तांकन करण्यासाठी विविध माध्यम प्रतिनिधी छायाचित्रकार दाखल झाले होते. यावेळी एकत्रित छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला असता. विद्यार्थ्यांऐवजी सर्व शिक्षक फोटो काढतेवेळी समोर थांबले. विद्यार्थ्यांना समोर थांबविण्याची सूचना करण्यात आली. पण शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे क्रीडा स्पर्धा शिक्षकांची की, विद्यार्थ्यांची? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.