तिसऱ्या व शेवटच्या वनडेत अफगाणवर 9 गडी राखून विजय : मालिका 2-1 फरकाने लंकेकडे
वृत्तसंस्था/ हंबनटोटा
येथे अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह लंकेने तीन सामन्यांची मालिकाही 2-1 फरकाने जिंकली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात अफगाणाचा डाव अवघ्या 116 धावांवर आटोपला. यानंतर लंकेने विजयासाठीचे लक्ष्य 16 षटकांत पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. लंकेचा दुषमंता चामीरा सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विशेष म्हणजे, या मालिकेत अफगाणिस्तानने पहिला वनडे सामना जिंकत दणक्यात प्रारंभ केला होता पण दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात त्यांना सातत्य न राखता आल्याने ही मालिका गमवावी लागली.
प्रारंभी, अफगाणिस्ताचा कर्णधार हशमतउल्लाहने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या चांगलच अंगलट आला. लंकेचा स्टार गोलंदाज दुषमंता चामीरा (63 धावांत 4 बळी) व वहिंदू हसारंगा (7 धावांत 3 बळी), लहिरु कुमारा (29 धावांत 2 बळी) यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणाचा डाव अवघ्या 22.2 षटकांत 116 धावांवर आटोपला. अफगाणच्या पाच फलंदाजांना केवळ दुहेरी आकडा गाठता आला. इतर खेळाडूंनी निराशा केल्यामुळे अफगाणिस्तान संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मोहम्मद नाबीने सर्वाधिक 23 धावा केल्या. तर इब्राहिम झद्रनने 22 धावांचे योगदान दिले.
विजयासाठी मिळालेले 117 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने 16 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर निसंका व दिमुथ करुणारत्ने यांनी 84 धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. निसंकाने 34 चेंडूत 51 धावा केल्या. करुणारत्नेने 45 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 56 धावांचे योगदान दिले. निसंका बाद झाल्यानंतर करुणारत्नेने कुसल मेंडिससह संघाला विजय मिळवून दिला. मेंडिस 11 धावांवर नाबाद राहिला. अफगाणकडून गुलाबदिन नईबने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 22.2 षटकांत सर्वबाद 116 (इब्राहिम झद्रन 22, मोहम्मद नाबी 23, गुलाबदिन नईब 20, फरीब अहमद नाबाद 13, दुषमंता चामीरा 63 धावांत 4 बळी, लहिरु कुमारा 29 धावांत 2 बळी, वहिंदु हसारंगा 7 धावांत 3 बळी).
श्रीलंका 16 षटकांत 1 बाद 120 (निसंका 51, करुणारत्ने नाबाद 56, कुसल मेंडिस नाबाद 11, नईब 19 धावांत 1 बळी).