दर्शनाला लोटला भाविकांचा सागर : आज गोपाळ काल्याने होणार सांगता
वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताहाला मंगळवारी दुपारी भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. उद्योजक प्रशांत जोशी यांनी श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून सप्ताहाला विधिवत प्रारंभ केला. त्यानंतर उपस्थित भजनी कलाकारांनी भजनाचे सूर आळवले. या भजनी सप्ताहाची सांगता आज दुपारी श्रीफळ विसर्जन व गोपाळ काल्याने होणार आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या ठोक्याला श्रीचरणी श्रीफळ अर्पण करताच अशोक मांद्रेकर यांनी ‘हरी जय जय राम…’ सूर आळवला आणि पारंपरिक भजनाची सुरुवात केली. नरेंद्र तोरस्कर, शशी उसगांवकर व स्थानिक भजनी कलाकारांनी आपापले अभंग सादर केले. यावेळी बाबू गडेकर, सतीश धुरी व इतरांनी साथसंगत केली. त्यांना हार्मोनियमवर अनिल कोंडुरकर, राजेंद्र बोरकर यांनी तर पखवाजावर सुर्या शेट्यो, विनोद मयेकर, शेखर मांद्रेकर व इतरांनी साथ केली. तद्नंतर स्थानिक भजनी पथकांच्या साखळी भजनाला प्रारंभ झाला.
अनेक मान्यवरांनी घेतले दर्शन
भजन प्रारंभाच्या प्रसंगी प्रसिद्ध भजनी कलाकारांसह बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, उद्योगपती नाना बांदेकर हजर होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर, माजीमंत्री जुझे फिलिप डिसोजा व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
भाविकांमध्ये उत्साहाला उधाण
यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. संध्याकाळी जेटी सडा येथून एम.पी.टी. फैलवाले कामगार संघाचा पहिला ‘शकटासूर वध’ पार दिंडीसह हरिनामाचा गजर करीत व टाळ मृदंगाच्या निनादात मंदिराकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर नाभिक समाजाचा, श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीचा व त्यानंतर दैवज्ञ ब्राह्मण, विश्वकर्मा ब्राह्मण समाज व गाडेकार समाज यांचे चलचित्रीत पार भजनी दिंडीसह मंदिराकडे मार्गस्थ होत राहिले.
गायन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
दिंडीच्या मार्गात नटराज थिएटर समोरील मंडपात, टॅक्सी स्टॅण्ड व मुरगाव नगरपालिकेच्या मागे व समोर अशा दोन्ही बाजूच्या मंडपात विविध समाजातर्फे आमंत्रित केलेल्या नामवंत गायक कलाकारांच्या मैफली पहाटेपर्यंत रंगतदार ठरल्या. श्रोत्यांनी आपल्या आवडत्या गायकांच्या बैठकींना उपस्थिती लावून संगीत मैफलीचा मनमुराद आस्वाद घेतला. गायनाच्या बैठकांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. मुरगाव हिंदू समाजाने आयोजित केलेल्या वार्षिक अन्नदान उपक्रमालाही हजारो भाविकांचा प्रतिसाद लाभला.अखंड भजनी सप्ताहाची आज दुपारी गोपाळ काल्याने उत्साहात सांगता होणार आहे. त्यानंतर पुढील आठ दिवस वास्को शहरात फेरी गजबजणार आहे.