पुणे / वार्ताहर :
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. मराठवाडय़ात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आंदोलकांनी आतापर्यंत एसटी महामंडळाच्या 16 गाडय़ा जाळल्या असून, 3 गाडय़ांची तोडफोड केली आहे. यात महामंडळाचे 4 कोटी 60 हजारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून पुण्याहून मराठवाडय़ाला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
पुण्याहून जालना, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड आणि लातूरला जाणाऱ्या एसटी बसेस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये 600 एसटी बस सोडण्यात येतात. मात्र, आज बस बंद असल्याने प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मराठवाडय़ात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरला, जालन्याला निघालेले बरेच प्रवासी अडकून पडले आहेत.