मुलींमध्ये मराठी विद्यानिकेतन-सेंट जोसेफ यांच्यात अंतिम लढत
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व वनिता विद्यालय इंग्लिश मिडियम हायस्कूल आयोजित कॅम्प विभागीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये सेंट जोसेफ व मराठी विद्यानिकेतन संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अंतिम फेरीत तर मुलांच्या गटात इस्लामिया, सेंट झेवियर्स, सेंट मेरीज व सेंट पॉल्स संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन मैदानावर घेण्यात आलेल्या कॅम्प विभागीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कॅम्प विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी खेळविण्यात आलेल्या मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफ संघाने सेंट झेवियर्स संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा अवलंब केला. त्यामध्ये सेंट जोसेफने झेवियर्सचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. जोसेफतर्फे झोया मुल्ला, साल्विनी गोम्स व शालीन यांनी गोल केले तर झेवियर्सतर्फे मोईया आणि लक्ष्मी यांनी गोल केले. दुसऱया उपांत्य सामन्यात मराठी विद्यानिकेतन संघाने सेंट मेरी संघाचा 3-0 असा पराभव केला. विद्यानिकेतनतर्फे अनुजा पाटील, युक्ता पाटील, श्रावणी सायनेकर यांनी गोल केले.
मुलांच्या गटात खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने एमव्हीएम संघाचा 3-0 असा पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे जोशवा वॉजने 2 तर नवलने 1 गोल केला. दुसऱया सामन्यात इस्लामियाने मराठी विद्यानिकेतन संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. इस्लामियाच्या रियानने एकमेव गोल केला. तिसऱया सामन्यात सेंट मेरीजने एनपीटी संघाचा 2-0 असा पराभव केला. सेंट मेरीजतर्फे गौरव व अनिकेत यांनी प्रत्येकी 1 गोल केला. चौथ्या सामन्यात सेंट झेवियर्सने वनिता विद्यालय संघाचा 4-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे रियान किल्लेदार व स्पर्श देसाई यांनी प्रत्येकी 2 गोल केले.
मंगळवारी पहिला उपांत्य सामना सेंट पॉल्स वि. सेंट मेरीज सकाळी 10 वा. तर दुसरा उपांत्य सामना इस्लामिया वि. सेंट झेवियर्स यांच्यात 11 वा. खेळविण्यात येणार आहे.
मुलींचा अंतिम सामना मराठी विद्यानिकेतन वि. सेंट जोसेफ यांच्यात दुपारी 12 वा. तर मुलांचा अंतिम सामना 1 वा. खेळविण्यात येणार आहे.