kolhapurmuncipalelection-कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी २९ जुलै रोजी आरक्षण सोडत जाहीर झाली. या आरक्षणावर ३० जुलै ते २ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती, सूचना देण्याची मुदत होती. मुदतीमध्ये एकही हरकत दाखल झालेली नसल्याने आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला आहे. ५ ऑगस्टला आरक्षण प्रभागनिहाय राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूकीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. ३१ वॉर्ड आणि ९२ सदस्य अशी प्रभाग रचना आहे. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी शिवाय आरक्षण सोडत काढली होती. मात्र, राज्य शासनाने ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी बांठिया आयोगाची नियुक्त केली. त्यांनी दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत ओबीसीसह निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे यापूर्वी ओबीसी शिवाय काढलेले आरक्षण रद्द झाले. केवळ अनुसूचित जाती १२, अनुसूचित जमाती १ असे १३ जागांवरील यापूर्वीचे आरक्षण कायम ठेवत उर्वरीत ७९ जागांमध्ये ओबीस, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण काढण्याचे आदेश महापलिकेला दिले. त्यानुसार २९ जुलै रोजी महापालिकेने ओबीसीसाठी २२, ओपनासाठी (सर्वसाधारण) २९ प्रभाग आरक्षित केले. याचबरोबर २८ प्रभाग सर्वसाधारणसाठी राहिले. महापालिकेने जाहीर केलेल्या या आरक्षणावर ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान हरकती, सूचना देण्याची मुदत होती. मंगळवारी दुपारी ३ वाजता ही मुदत संपली असून एकही हरकत दाखल झालेली नाही. यामुळे मनपाने काढलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला आहे. ५ ऑगस्टला प्रभाग निहाय आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार असून याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविला जाणार आहे.