प्राणी संग्रहालयात पर्यटकांचा ओघ : महसुलात वाढ, वाघ जवळून पाहण्याची संधी, संग्रहालयात आतापर्यंत 25 हून अधिक वन्यप्राणी दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात मिनी टायगर सफारीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि वाघप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. शिवाय भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे.
म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधून या ठिकाणी विविध वन्यप्राणी आणण्यात आले आहेत. वाघ, सिंह, बिबटय़ा, कोल्हे, हरिण, सांबर, चितळ, अस्वल, तरस आदी प्राणी टप्प्याटप्प्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्याबरोबरच वाघाचे जवळून दर्शन व्हावे आणि टायगर सफारीचा आनंद लुटता यावा, यासाठी टायगर मार्गाचा विकास साधला जात आहे. सध्या मिनी टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्रेमींना अगदी जवळून वाघाला पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नरेगा योजनेंतर्गत टायगर सफारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याबरोबर सफारीसाठी विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काळात मोठय़ा प्रमाणात टायगर सफारी घडविली जाणार आहे.
प्राणी संग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. विशेषतः दसऱयाची सुटी असल्याने बालचमू आणि शालेय विद्यार्थी कुटुंबासोबत दाखल होत आहेत. बेळगावबरोबर गोवा, कोकण, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणाहून पर्यटक गर्दी करत आहेत. त्यामुळे महसूलदेखील हळूहळू वाढत आहे. संग्रहालयात आतापर्यंत 25 हून अधिक वन्यप्राणी दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही मांसाहारी असल्याने दैनंदिन खर्चदेखील अधिक आहे. विशेषतः सिंह, वाघ, कोल्हे, बिबटय़ा आणि तरस या वन्यप्राण्यांच्या मांसाहारावर अधिक खर्च केला जातो. त्यामुळे दैनंदिन खर्चदेखील अधिक आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या देखभालीसाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. या योजनेलादेखील वन्यप्रेमींकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.
तब्बल 39 हेक्टर परिसरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मोठय़ा प्राण्यांसाठी निवास कोठडी आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना वन्यप्राणी पाहण्यासाठी परिसरात रस्त्यांची बांधणीही करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना अगदी जवळ जाऊन पाहता येते. तर काही पर्यटक वन्यप्राण्यांसोबत सेल्फी घेण्यामध्ये दंग असल्याचेही दिसत आहे.
पर्यटकांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण
संग्रहालयात दोन वाघ दाखल झाले आहेत. त्यांची स्वतंत्र होल्डिंग रुममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या मिनी टायगर सफारीसाठी त्यांना बाहेर काढले जात आहे. त्यामुळे पर्यटकांचे टायगर सफारीचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. टायगर सफारीसाठी विशेष संरक्षक जाळी, लॉक कंट्रोल सिस्टीमसह वाहन करण्यात आले आहे. वाहनाभोवती संरक्षक जाळी असल्याने पर्यटकांना सुरक्षितता निर्माण झाली आहे. या वाहनामध्ये बसून पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
प्राणी संग्रहालय मंगळवार वगळता सर्व दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले ठेवले जात आहे. प्रौढांना 40 रुपये तर पाच वर्षांखालील लहानांना 20 रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. त्याबरोबर मिनी टायगर सफारीला 20 रुपये शुल्क घेतले जात आहे.
टायगर सफारीचा विस्तार वाढणार
प्राणी संग्रहालयात सध्या मिनी टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात टायगर सफारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर टायगर सफारीचा विस्तार वाढणार आहे. याबरोबर संग्रहालयात वॉकिंग ट्रक, शौचालय आणि पायी चालत जाणाऱया पर्यटकांसाठी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.
– विनोद अंगडी (आरएफओ, भुतरामहट्टी प्राणी संग्रहालय)