भाजपचे सरकार संवेदनशील : तानावडे
प्रतिनिधी/ मडगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने काल शनिवारी मेगा जनसंपर्क अभियानांतर्गत नव्याने उद्घाटन झालेल्या केबल स्टे जुवारी पुलावरून दक्षिण गोव्यातील ‘विकास तीर्थ यात्रे’ ला सुऊवात केली.
‘विकास तीर्थ यात्रे’चे उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सुशासन, चांगली कामे पाहणे, तपासणे आणि इतरांना त्यांचे वर्णन करणे हे आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, भाजपचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक, सर्वानंद भगत, शर्मद पै रायतूरकर, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, उर्फान मुल्ला इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विकास तीर्थ यात्रेला प्रारंभ झाला.
‘राज्यातील भाजप सरकार संवेदनशील आहे. काँग्रेसचे राहूल गांधी विदेशात जाऊन लोकशाहीचे धिंडवडे काढतात. भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात विकास केला आहे. गोव्यात पेडणे ते काणकोण पर्यंत पुर्णत्वास आलेले प्रकल्प विविध भागात जाऊन जन संपर्क साधून जनतेपुढे ठेवणे व त्याचे वर्णन करणे हे विकास तीर्थयात्रेच उदिष्ट आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या कारकीर्दीची पुस्तिका भेट देवून लोकांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सुशासन, लोकांच्या डोळ्यासमोर ठेवायचा हा प्रयत्न आहे. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार परत एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येईल यात शंकाच नाही. 2014च्या निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागा भाजप जिंकणार हे नक्की’ असा विश्वास यावेळी श्री. तानावडे यांनी व्यक्त केला