विस्कळीतपणा टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची सूचना : गणेशोत्सव महामंडळाची बैठक
बेळगाव : काही गणेशोत्सव मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीदिवशी उशीर केला जात असल्याने संपूर्ण मिरवणूकच उशिराने निघत असून यामध्ये विस्कळीतपणा जाणवत आहे. त्यामुळे यावर्षी विसर्जनाच्या आदल्या दिवशी लिलाव आटोपून दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करावी, अशा सूचना पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी रविवारी आयोजित महामंडळाच्या बैठकीत केल्या. मार्केट पोलीस स्थानकात रविवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ व शहापूर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी बैठकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकी दिवशी रात्री 12 वाजता चन्नम्मा सर्कल येथून गणेशमूर्तींना प्रवेशबंदी केली जाणार आहे. त्यामुळे उत्तर भागातील सर्व मंडळांनी रात्री 12 पूर्वी आपल्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये आणण्याच्या सूचना करण्यात आल्या.
विसर्जन मिरवणुकीतील विस्कळीतपणा कमी करण्यासाठी प्रत्येक मंडळाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. शिवजयंतीप्रमाणेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत डीजेवर निर्बंध घातले जाणार आहेत. कायदा मोडणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी मुस्लीम समाजाचे कौतुक केले. बैठकीला खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, आनंद आपटेकर, शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, नितीन जाधव, रमेश सेंटक्की, विजय जाधव, सुनील जाधव यासह इतर सदस्य उपस्थित होते.