राज्य शालेय कुस्ती स्पर्धा : ओंकार, अभिषेक, हर्षवर्धनकडून सुवर्ण तर प्रणवकडून कांस्यपदकाची कमाई
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यस्तर शालेय 17 वर्षाखालील मुलांच्या ग्रिकोरोमन व फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीतील मल्ल ओंकार कुंभार, अभिषेक लिमन, हर्षवर्धन खांडेकर यांनी शानदार कामगिरी करत प्रत्येकी 1 सुवर्ण पदकावले. तसेच प्रणव काळेने कांस्य पदकाला गवसणी घातली. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या 51 किलो ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारातील अंतिम लढतीत ओंकार कुंभारने औरंगाबादच्या सुरज शेडगेला 8-0 अशा गुणांनी हरवून सुवर्ण पदक जिंकले. ओंकार हा जवाहरनगर इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी व म्हारूळ (ता. करवीर) या गावाच रहिवासी आहे. स्पर्धेच्या 55 किलो फ्रीस्टाइल प्रकारामध्ये अभिषेक लिमननेही अंतिम फेरीमध्ये औरंगाबादच्याच रोहित जाधवला झोळी डावावर आस्मान दाखवून सुवर्ण पदकावर कब्जा केला. अभिषेक हा नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असून तो कोल्हापूर क्रीडा प्रबोधिनीत कुस्तीचे धडे घेत आहे. 65 किलो ग्रिकोरोमन प्रकारांमध्ये हर्षवर्धन खांडेकरने कोल्हापूरच्याच समीर पाटीलला 8-0 गुणांनी हरवून सुवर्णपदक प्राप्त केले. हर्षवर्धन हा नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तो लिंगनूर (गडहिंग्लज) गावचा रहिवासी आहे.
साठ किलो फ्रीस्टाइल प्रकारामध्ये प्रणव काळेला मात्र कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या पदकासाठी झालेल्या लढतीत प्रणवने औरंगाबादच्या शौर्य तोषीबला 6-4 गुणफरकांनी जिंकले. प्रणव हा बोलोली (ता. करवीर) येथील स्वयंभू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असून तो पासर्डे (ता. करवीर) या गावचा रहिवासी आहे. स्पर्धेतील वरील सर्व पदक प्राप्त मल्लांना क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर साखरे, शासकीय कुस्ती मार्गदर्शक प्रवीण कोंडावळे व एनआयएस कुस्तीकोच कृष्णात पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.