क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केएलई युनिव्हर्सिटी, कर्नाटक स्वीमिंग असोसिएशन व स्वीमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 29 मे दरम्यान स्टेट सब ऍण्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचे प्रथमच बेळगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱया या स्पर्धेमध्ये राज्यातील 800 हून अधिक जलतरणपटू सहभागी होणार असल्याची माहिती केएलईचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठिवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगावमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडावेत यासाठी अशी भव्य स्पर्धा केएलईच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे. केएलईच्या नेहरूनगर येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात स्पर्धा होणार आहे. कर्नाटकातील काही जलतरणपटू दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सराव करत असून असे काही स्पर्धकही यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांनी दिली.
या स्पर्धेमुळे अनेक जलतरणपटूंना प्रोत्साहन मिळणार आहे. 25 रोजी या स्पर्धांना सुरूवात होणार असून, 26 रोजी स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे. या स्पर्धेत अनेक नामांकित जलतरणपटू सहभागी होणार आहेत. ऑलिंपिकच्या धर्तीवर सुसूत्र नियोजन करून स्पर्धा घेतली जात आहे. विविध प्रकारात या स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचे राष्ट्रीय जलतरणपटू इंद्रजीत हलगेकर यांनी सांगितले. यावेळी स्वीमर्स क्लबचे सेपेटरी सुधीर कुसाने, प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यासह इतर उपस्थित होते.