यंदा सहाजणांची निवड, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
प्रतिनिधी/ पणजी
उद्या साजरा करण्यात येणाऱया शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यासाठी सहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
2021-22 या वर्षासाठी हे पुरस्कार असून लवकरच आयोजित करण्यात येणाऱया सरकारी पातळीवरील शिक्षकदिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पणजीतील मिनेझिस ब्रागांझा संस्थेत सकाळी 11 वाजता हा सोहळा होणार आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये प्राथमिक गटात ठाणे सत्तरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या सरोजिनी गावस, तर माध्यमिक नगरगाव सत्तरी येथील गणपतराव राणे आणि शिवोली येथील सेंट फ्रान्सिस झेवियर माध्यमिक विद्यालयाचे डायगो पिंटो यांचा समावेश आहे.
त्याशिवाय उच्च माध्यमिक प्राचार्य गटात सासष्टी राय येथील गावकर कला, वाणिज्य आणि व्यावसायिक उच्च मा. विद्यालयाचे प्राचार्य मारियो कॉस्ता, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक गटात नगरगाव येथील सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोटकर तर उच्च माध्यमिक शिक्षक गटात कुर्टी फोंडा येथील अमेय उ. मा. विद्यालयाचे सुभाष जाण यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.