भारतात सातत्याने खेडय़ांकडून शहरांकडे काम शोधण्यासाठी युवकांचा ओघ सुरू असतो. त्यामुळे शहरांशी लोकसंख्या असहय़ प्रमाणामध्ये वाढत आहे. यामुळे अनेक समस्याही निर्माण होत आहेत. अशी स्थिती अनेक प्रगत देशांमध्येसुद्धा आहे. शहरांमध्ये लोकसंख्येचा ताण वाढल्याने नागरी सुविधांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वीत्झर्लंडच्या सरकारने एक अनोखी योजना लागू केली आहे. त्यानुसार शहरातून खेडय़ांमध्ये जाऊन तेथे कायमस्वरुपी वास्तव्य करणाऱया युवकांना 49 लाख रुपये दिले जात आहेत.
स्वीत्झर्लंडमधील अल्बीनेन या गावात असा प्रयोग करण्यात आला आहे. हे गाव 4 हजार 265 फूट उंचीवर असून अतिशय सुंदर अशा पहाडी प्रदेशात आहे. अनेक लोक येथे पर्यटनासाठी जातात. स्वीत्झर्लंड, इटली आणि फ्रान्स यांच्या सीमारेषेवर हे गाव आहे. शहरातील युवक आपल्या परिवारासह या गावी जाऊन राहण्यास तयार असतील तर त्यांना 50 हजार स्वीस पाऊंड अर्थात 49 लाख भारतीय रुपये देण्यात येतात. तसेच त्यांच्या घराची व्यवस्था केली जाते. मात्र, यासाठी एक अट घालण्यात आली आहे. खेडय़ात स्थायिक होणाऱया युवकाचे वय 45 पेक्षा कमी असले पाहिजेत. तसेच त्याने आपला पूर्ण परिवार तेथे स्थायिक केला पाहिजे. तसेच किमान दहा वर्षे त्याने तेथे वास्तव्य केले पाहिजे. दहा वर्षांनंतर त्याला अधिक पैसे देण्याची योजना आहे. मात्र, दहा वर्षांच्या आधी त्याने गाव सोडल्यास संपूर्ण रक्कम त्याला परत द्यावी लागणार आहे. या अटींमुळे कित्येक तरुण तेथे जाण्यास कचरतात. तथापि, अनेकांनी शांत जीवन आणि पैसा या दोन्ही लाभांमुळे ही योजना स्वीकारली आहे. ती यशस्वी झाल्यास अन्य गावांमध्येही ती लागू करण्याची स्वीत्झर्लंड सरकारचा विचार आहे.