सांखळी पालिकेसह विविध पंचायत क्षेत्रांत स्वच्छता मोहीम
सांखळी : आपल्या परिसरात साचणाऱ्या कचऱ्याला आपणच जबाबदार आहोत. आपल्या घरातील ओला किंवा सुका कचरा उघड्यावर फेकण्याची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत ही समस्या मिटणार नाही. लोकांकडून सर्वत्र होणाऱ्या कचऱ्यासाठी आज सरकारला अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्याचा ताण सरकारी तिजोरीवर पडतो. त्यासाठी आपण प्रत्येकाने आज कचरा समस्येवर संवेदनशील व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. सांखळी नगरपालिकेतर्फे हाऊसिंगबोर्ड जंक्शनवर स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी झेंडा दाखवून सुरूवात केली. यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेविका निकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, प्रवीण ब्लेगन, दयानंद बोर्येकर, पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर व इतरांची उपस्थिती होती.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानला नऊ वर्षे झाली. या मोहिमेत आतापर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. पण एक दिवस कचरा उचलून आपला गाव, शहर, राज्य, देश स्वच्छ होणार नाही. तर कचरा साफ करण्यापेक्षा आपण कचरा करणार नाही, यासाठी प्रत्येकाने शपथबद्ध व्हावे लागेल. तेव्हा कचऱ्याची समस्या नियंत्रणात येईल, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडले. सांखळी शहर स्वच्छ सुंदर व्हावे, यासाठी नगरपालिका सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांना सांखळीतील प्रत्येक नागरिकाने सहकार्य देणे आवश्यक आहे. नगरपालिकेतर्फे कचऱ्यासंदर्भात काही नियम घालून दिले आहेत. ते पाळून स्वत:च कचऱ्यावर नियंत्रण ठेवावे. नगरपालिका कचऱ्याच्या बाबतीत गंभीर व संवेदनशील असून काही कडक पावलेही भविष्यात उचलणार, असे यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर या परिसरात मुख्यमंत्री, नगराध्यक्ष व उपस्थित नगरसेवक व नागरिकांनी फिरून कचरा गोळा केला.
ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता मोहीम
सांखळी मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांचाही सहभाग होता. वेळगे, पाळी, कुडणे, न्हावेली, आमोणा, हरवळे पंचायत क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे सदस्य कार्यकर्ते, सरपंच, पंच, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था यात सहभागी झाले होते. सर्व पंचायत कार्यालयात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्वच्छता अभियानास सांखळी मतदारसंघातून चांगला प्रतिसाद लाभला.